
अल्पवयीन सुनेला शिकण्याची आस असतानाही जाच करत तिला शिक्षणापासून परावृत्त करणाऱ्या तसेच तिच्या आत्महत्येला कारणीभूत ठरणाऱ्या सासूला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला. अल्पवयीन मुलगी ही परिस्थितीची बळी ठरली असून बालविवाहामुळे ती शिक्षणापासून वंचित राहिली. सासरच्या जाचामुळे तिचे केवळ शिक्षणच सुटले नाही तर मुलीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे स्पष्ट करत न्यायालयाने आरोपी सासूचा जामीन अर्ज फेटाळून लावला. एवढेच नव्हे तर केंद्र सरकारची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही महिला सक्षमीकरणाची योजना केवळ दिखावा असल्याचे निरीक्षणही नोंदवले.
आठवीतील 14 वर्षांच्या मुलीचे मनाविरोधात लग्न लावून देण्यात आल्याची घटना सोलापूर येथे उघडकीस आली आहे. सुरुवातीस या लग्नाला तिच्या आजारी आईचा विरोध होता. पण सासरच्या मंडळींनी मुलीच्या आजारी आईसाठी केलेला शस्त्रक्रियेचा व रुग्णालयाचा खर्च परत मागितल्यामुळे नाइलाजास्तव मुलीला जबरदस्तीने लग्न करावे लागले. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस पीडित मुलगी नियमित शाळेत जायची. पण सासरच्यांनी पुढे तिला शाळेत जाण्यास विरोध केला. आपल्याला शाळेत शिकायचे असल्याची इच्छा तिने सासरच्यांसमोर व्यक्त केल्यानंतर त्यांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. एका दिवशी तिने आत्महत्या केल्याचे मुलीच्या आईला फोनवरून सांगण्यात आले होते.
शेवटच्या क्षणापर्यंत तिचा छळ
आरोपीने पीडितेचा वारंवार छळ करत तिच्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक ठेवलेला नाही. त्यामुळे आरोपीवर आयपीसी कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्रही दाखल केले असून सासूने पीडितेचा छळ करून तिला शिक्षणापासून परावृत्त करून आत्महत्या करण्यास भाग पाडले असल्याचे म्हटले आहे. एकंदरीत शेवटच्या क्षणापर्यंत पीडितेचा छळ सुरू असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आरोपी जामिनास पात्र नसल्याचे सांगत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.































































