व्हर्च्युअल प्रेम नको रे बाबा! लॉकडाऊनमध्ये प्रेमाचे बंध झाले घट्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं… कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लागले आणि ‘सेम’ असणारी तुमच्या-आमच्या प्रेमाची परिभाषा बदलली. न्यू नॉर्मलमध्ये व्हर्च्युअल प्रेमाची चर्चा रंगली. पण खरं सांगायचं तर वास्तवातील प्रेमाची सर व्हर्च्युअल प्रेमाला येणार नाही, असेच सर्वांचे मत आहे. प्रेमाच्या आभासी दुनियेत खरेपणा नाही आणि त्यात धोकादेखील आहे. त्यामुळे दीर्घकालीन प्रेमावरचा लोकांचा विश्वास कायम आहे. लव्ह सर्व्हे 2021चा अहवाल हेच सांगत आहे.

आयटीसी एंगेज या आघाडीच्या ब्रॅण्डने आयपीएसओएस कंपनीसोबत नुकताच प्रेमावर आधारित सर्व्हे घेतला. यात न्यू नॉर्मलमधील प्रेमाची बदलती भाषा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रेम, नाते, संवादाची सुरुवात, आकर्षण, व्हर्च्युअल विरुद्ध वास्तवातील रोमान्स आणि भावभावना कशा बदलत गेल्या याची माहिती घेण्यात आली. 18 ते 35 वर्षे वयोगटातील व्यक्तींनी सर्व्हेमध्ये सहभाग घेतला. त्यातील 63 टक्के जणांनी दीर्घकालीन नात्यांवर विश्वास दर्शवला.

98 लोकांना वाटतेय की, व्हर्च्युअल रोमान्स वास्तवातील रोमान्सपेक्षा पूर्णत: वेगळे आहे. व्हर्च्युअल रोमान्समध्ये वास्तवतेचा अभाव आहे. महानगरांतील 50 टक्के लोकांनी व्हर्च्युअल रोमान्स नखरेबाज, प्रासंगिक असण्याबरोबरच त्यात गांभीर्य नसल्याचे मत नोंदवले आहे. 46 टक्के लोकांनी व्हर्च्युअल विश्वातील रोमान्स अत्यंत घातक असतो, असे मत व्यक्त केले.

नात्याचा अर्थ समजला

लॉकडाऊनमुळे नवीन नात्यांवर तणाव निर्माण झाला. जवळपास 80 टक्के व्यक्तींनी नव्या नात्याची सुरुवात किंवा नवे नाते विकसित करायला अडथळे येत असल्याचे मत व्यक्त केले. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे लोकांना त्यांच्या नात्यांचे अर्थपूर्ण पैलू समजण्यासदेखील मदत झाली, असेही निदर्शनास आले. महामारीच्या कारणामुळे करण्यात आलेल्या विलगीकरणामुळे 85 टक्के व्यक्तींना त्यांच्या नात्यांचे अर्थपूर्ण पैलू समजण्यास मदत झाली आहे. 84 टक्के जणांनी जोडीदारांसोबत जुळण्याचे नवीन मार्ग सापडण्यास मदत झाल्याचे सांगितले.