
पूरग्रस्तांच्या मदतीला गेलेले पालिकेचे पाच कर्मचारी आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पालिकेचे सुमारे 500 कर्मचारी महाड, पोलादपूर, सोलापूर, सांगली आणि चिपळूण आदी भागांत गेले होते. हे कर्मचारी आता परत आल्यानंतर सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली. राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत अनेक लोकवस्त्या, बाजार, घरांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार घडले होते. मोठय़ा प्रमाणात चिखल, घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत पूरग्रस्तांच्या मदतीला मुंबई महानगरपालिका धावून गेली. सफाई कर्मचारी, टेक्निशियन, डॉक्टर, जनावरांचे डॉक्टर आदींची टीम पूरग्रस्त भागात मदतकार्यासाठी पोहोचली. हजारो मेट्रिक टन गाळ, चिखल, कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला. हे काम केल्यानंतर परतणाऱया कर्मचाऱयांची कोरोना चाचणी केली जात आहे.
…म्हणूनच होतेय चाचणी
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेले सर्व कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेतील आहेत. त्यामुळे या ठिकाणी मदतकार्य करून आल्यानंतर पुन्हा पालिकेच्या सेवेत रुजू होणार आहेत. एखाद्या कर्मचाऱयाला लागण झाली तरी कोरोना पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागात मदतकार्य करून येणाऱया सर्व कर्मचाऱयांची कोरोना चाचणी करणार असे काकाणी यांनी स्पष्ट केले.
खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदत म्हणून 100 गॅस शेगडय़ा माजी आमदार सदा चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
शिवसेना माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना संपर्कप्रमुख भाई विचारे यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यावेळी तालुका संपर्कप्रमुख शांताराम चव्हाण, विभागप्रमुख बळीराम गुजर, पुष्कर चव्हाण, केतन चव्हाण, संतोष पवार, दीपक ओकटे, कल्पेश भाविशी, प्रकाश सावंत, प्रथमेश चव्हाण, कुणाल वाघदरे, रोहन अणेराव आदी उपस्थित होते.
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली (मुंबईचा राजा) मंडळातर्फे महाड व चिपळूण येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तसेच स्वच्छता करण्यासाठी लागणाऱया वस्तू देण्यात आल्या. यावेळी मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे, सचिव स्वप्नील परब, उपाध्यक्ष संजय सावंत, नंदकुमार बागवे, अभिषेक शिवलेकर, गौरव सावंत, सिद्धेश सावंत, ज्ञानेश शिर्पे, विराज माडखोलकर, सिद्धेश घाडीगावकर, समीर आंबेरकर, धनेश कुवाड, शैलेश ठाकूर, महेश गावडे, प्रवीण पालेकर, दीपक नाईक, प्रफुल्ल करावडे, सचिन राऊत व पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई पोर्ट ट्रस्ट स्थानीय लोकाधिकार समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कर्मचारी व अधिकारी वर्गाने सढळहस्ते मदत केली. ही मदत नुकतीच स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडे सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी महासंघाचे चिटणीस वामन भोसले, शरद एक्के, उमेश नाईक, मुंबई पोर्ट ट्रस्ट स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर, कार्याध्यक्ष नंदू राणे, संजय माधव, सरचिटणीस सूर्यकांत शिंदे, कोषाध्यक्ष प्रमोद दळवी, उपाध्यक्ष विजय सावंत, अमोल म्हात्रे, चिटणीस बबन शिरोडकर, राकेश भाटकर आदी उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते भूषण पवार आणि मित्रमंडळातर्फे महाडमधील 9 खेडेगावांत 300 पूरग्रस्त कुटुंबाना धान्य, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.































































