पावसाअभावी सोयाबीन करपू लागले; लातूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील सर्वाधिक सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून लातूर जिल्हा ओळखला जातो. यावर्षी लवकर पाऊस सुरू झाल्यामुळे पेरणीही लातूर जिल्ह्यात लवकर झाली. त्यामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरणी झाली. मात्र मागील 23 दिवसांपासून लातूर जिल्ह्यात पाऊस गायब आहे. पावसाची जास्त ओढ खरीप पिक सहन करू शकत नाहीत. त्यामुळे हलक्या जमिनीवरील सोयाबीन करपून गेले आहे. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादनात यामुळे मोठी घट होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

या वर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केल्यानंतर सोयाबीनचे दर वाढले.या वर्षात प्रथमच जुनमध्ये लवकर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकर पेरणी करून घेतली. सोयाबीन चांगले उगवले त्यामुळे आनंदी झालेल्या शेतकऱ्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. तब्बल 23 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दिसून येत आहे. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

आलमलामध्ये मागील 20 ते 25 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आलमला परिसरातील हलक्या, माळरान शिवारातील पिके होरपळून गेलेली दिसत आहेत. यावर्षी मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी वेळेवर पेरणी केली. मात्र 20 ते 25 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन पिक माना टाकत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

देवणी तालुक्यातील देवणी, बोरोळ व जवळगा तीनही मंडळात अनेक दिवसांपासून पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कोरोनामुळे जनजीवन रुळावर येत असतानाच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतातील सोयाबीन, तूर, मुग, व उडीद यासह इतर उभे पिके वळत आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून आता पावसाची प्रतिक्षा करत गावागावात देवळात शेतकरी साकडे देवाला घालतांना दिसत आहेत.

वडवळ नागनाथ परिसरात पावसाअभावी खरिपाच्या सर्वच पिकांनी माना टाकल्या असून दोन दिवसांत पाऊस पडला नाही तर खरीप हंगामातील प्रमुख पिके हातची जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. या परिसरात यावर्षी मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने येथील शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. यात प्रामूख्याने नगदी पीक म्हणून सोयाबीन, उडीद, मुग आदीची पेरणी केली आहे. पावसाने उघडीप दिल्याने ऐन बहाराच्या व शेंग लागवडीच्या वेळी पिकांनी पूर्णतः माना टाकल्या आहेत. सोयाबीनची फुले गळताना दिसत आहेत. यामुळे सोयाबीन उत्पादनात सत्तर टक्क्यांहून अधिक घट होणार असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

जळकोटमध्ये पावसाने दीर्घ उघडीप दिल्याने जळकोट तालुक्यातील सोयाबीन करपायला सुरुवात झाली आहे. पाऊस कधी पडतो या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. पण आला दिवस पावसाविना जात असल्याने जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांची घालमेल वाढली आहे. केवळ सोयाबीनच नव्हे तर मूग, उडीद, तूर, कापूस आदी सर्वच पिके कोमेजून जात आहेत. वेळेवर पाऊस पडला नसल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. त्यामुळे उत्पादन घटून शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. आता लवकर पाऊस पडला नाही तर सोयाबीनसह सर्व पिके वाया जाऊन उत्पादन शून्य होईल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. जळकोटचे तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पावसाअभावी आलेल्या परिस्थितीमुळे खचून न जाता किडीपासून पिकांच्या संरक्षणासाठी योग्य ती खबरदारी घेऊन उत्पादन वृद्धीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले आहे.

उदगीर तालुक्यातील गुडसूर परिसरात गेले 20 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीनचे पीक सुकत आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादनात घट होण्याची भिती व्यक्त केली जात असून शेतकरी चिंतेत आहे. यंदा मृग नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली पण नंतर पावसाने उघडीप दिली. त्यामुळे अनेकांनी 15 दिवसानंतर पेरणी केली. मृगात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन फुलोऱ्यात आहेत. ज्यांनी नंतर पेरणी केली होती त्यांच्या पिकांच्या वाढीसाठी पाऊस आवश्यक आहे पण परिसरात 20 दिवसापासून पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. सुरुवातीपासूनच चांगला पाऊस पडल्याने शिवारात सोयाबीन सर्व पिके भरली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्साहाने कोळपणी, खुरपणा, कीडनाशकांची फवारणी यावर खर्च केला. मात्र आता काही दिवस पाऊस आला नाही तर मूग, उडीद, सोयाबीन ही पीके हातातून जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

निलंगा तालुक्यातील कोरडवाहू क्षेत्र सर्वाधिक असल्याने येथील शेतीचे उत्पादन निसर्गाच्या पाण्यावरच घेतली जाते. सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्ंयांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा केला. परंतु गेल्या 25 दिवसापासून पावसाने दडी मारल्याने हलक्या रानावरील पिके आता करपू लागले आहे. यावर्षीच्या सोयाबीन उत्पादनाला फटका बसल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागून राहिलेल्या आहेत. सोयाबीन आता जागेवरच वाळून जात असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी बिघडण्याच्या मार्गावर आहे. पावसाने दडी मारल्याने जमिनीवरील हिरवे पिके आता करपू लागलेले आहेत. भादा परिसरात गेल्या 20 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीन पीक वाळू लागले आहेत. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळल्याची चिन्ह दिसून येत आहे. शेतकरी हताशपणे पिक पाहून घरी परतत असल्याचे दिसून येत आहे.

शिरुर ताजबंद परिसरातील सोयाबीन पिकावर खोड अळी व पाने कुरतडणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी फवारणी करत आहेत. सध्या सर्वच पिके जोमदार असून सोयाबिनला चांगल्या प्रकारची फुले आली आहेत. सोयाबीनवर खोड अळी व पाने कुरतडणाऱ्या अळ्या मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने शेतीत फवारण्या करण्यात येत आहेत. तीन दिवसापासून पावसामुळे पिके पिवळे पडत असून तेथील पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.