पंढरपुरात आंतरजिल्हा दुचाकीचोरांची टोळी जेरबंद, 29 दुचाकी हस्तगत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंढरपूर, दि. 14 (प्रतिनिधी)- शहरासह सोलापूर जिल्हा आणि परजिल्ह्यातून दुचाकी चोरून त्यांची विक्री करणाऱया टोळीला अटक करण्यात पंढरपूर शहर पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या ताब्यातून 14 लाख 40 हजार रुपयांच्या 29 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून, चारजणांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली आहे.

महेश कांतिलाल नवले (वय 21, रा. अकोले बु. ता. माढा), सिद्धार्थ उर्फ अमर संजय मुसळे (वय 23, रा. परिते, ता. माढा), सदाशिव महादेव फडतरे (वय 28, रा. तुंगत, ता. पंढरपूर), सोमनाथ उर्फ दादा दिलीप वाघमारे (वय 22, रा. कंदर, ता. करमाळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

23 जुलै रोजी अकोले बु. येथील चोरीची दुचाकी विकण्यासाठी एकजण पंढरपूर शहरातील चंद्रभागा बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे राजेंद्र मगदूम यांना मिळाली होती. त्यांनी सापळा रचून महेश नवले व अमर मुसळे या दोघांना ताब्यात घेतले. नवले याच्याकडून आठ, तर मुसळे याच्याकडून 11 अशा 19 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. या दुचाकी इंदापूर, नातेपुते, वालचंदनगर, यवत, कोथरूड, कुर्डुवाडी, माळशिरस, बंडगार्डन, खडकी, बारामती, भोसरी, सांगली येथून त्या चोरून आणल्याचे त्यांनी सांगितले.

चौकशीदरम्यान सदाशिव फडतरे याच्याकडे सहा, तर सोमनाथ वाघमारे याच्याकडे तीन दुचाकी विकण्यासाठी दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तुंगत येथे छापा टाकून सहा, तर कंदर येथून चार दुचाकी हस्तगत केल्या. चारही आरोपींकडून पोलिसांनी 14 लाख 40 हजार रुपये किमतीच्या 29 दुचाकी जप्त केल्या असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.