
>> डॉ. रामनाथ खालकर
चीन ‘ठोशास ठोसा हेच योग्य धोरण’ नावाचा अनिल दत्तात्रेय साखरे यांचा दै. ‘सामना’मधील लेख वाचला. (5 ऑगस्ट 2021) राष्ट्र रक्षणाच्या दृष्टीने विचार केला असता लेखातील विचार अगदी व्यावहारिक आहेत. कुठल्याही राष्ट्राने स्वरक्षणासाठी सदैव सज्ज असावयास हवे. म्हणूनच ‘तेव्हा हिंदुस्थाननेही अशी सगळी सज्जता कुठलाही पाप-पुण्याचा विचार किंवा कुठलेही विधिनिषेध न बाळगता करायला हवी.’ हे लेखकाचे म्हणणे अगदी योग्य वाटते. कुठलेही युद्ध हे राष्ट्रासाठी ‘आपत्काल’ असते. आपत्कालातील धर्म व कर्तव्ये ही सामान्य काळातील धर्म व कर्तव्यांपेक्षा वेगळी असतात. अशा आपत्कालीन धर्मास ‘आपद्धर्म’ म्हणतात. आपत्कालीन धर्माचे आचरण हे अधर्माचरण नसते. म्हणून साखरे यांचे विचार आपद्धर्म या संकल्पनेशी सुसंगत आहेत. या लेखातील शेवटच्या परिच्छेदात असे म्हटले आहे की, महाभारतकार महर्षी व्यासांनी आपल्या महाभारत ग्रंथात लिहून ठेवले आहे की, ‘लभ्या धरित्री तव विक्रमेण, प्रकर्षतत्रा हि रणे जयश्रीः’ परंतु यात अनवधानाने चूक झाली आहे. साखरे यांनी उल्लेखिलेला हा श्लोक महाभारतातील नसून तो महाकवी भारवीने लिहिलेल्या ‘किरातार्जुनीयम्’ या महाकाव्यातील आहे. अर्थात या काव्यामध्येही महर्षी व्यासांनीच या श्लोकातून युधिष्ठराला उपदेश केला आहे. भारवीचे हे महाकाव्य महाभारतातील वनपर्वातील ‘कैरातपर्व’ नावाच्या चौथ्या उपपर्वातील कथानकावर आधारित आहे. यात अर्जुन किरात वेशधारी भगवान शंकराकडून पाशूपतास्त्र कसे मिळवितो याचे वर्णन व्यासांनी महाभारतात केले आहे. भारवीच्या या किरातार्जुनीयम् महाकाव्यात व्यास युधिष्ठरास व्यवहार समजावतात. ते म्हणतात, कौरवांचा पक्ष अन्यायाचा आहे. धृतराष्ट्राने केवळ राज्यलोभाने तुम्हा पांडवांना दूर केले आहे. शिवाय तो दुर्योधन, दुःशासन, कर्ण व शकुनी यांच्या सल्ल्याने वागत आहे. तो क्षमाशील असूनही तुला त्यांनी कपटाने फसविले आहे. तू आपत्काळात क्षमा, समता व अहिंसादी गुण सांभाळत आहेस. पण अशाने तुझा निभाव लागणार नाही. तुला आपले राज्य पराक्रमाने मिळविले पाहिजे. ते सद्गुणांच्या आचरणाने मिळणार नाही. तुझे शत्रू शस्त्रास्त्रांनी प्रबळ आहेत. म्हणूनच तुला तुझे शस्त्रबल अधिक वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण रणांगणावरील जय अधिक प्रभावी शस्त्रांनीच मिळतो. किरातार्जुनीयम्मध्ये असा अर्थ असलेला मूळ श्लोक पुढीलप्रमाणे –
लभ्या धरित्री तव विक्रमेण, ज्यायांश्र्च वीर्यास्त्रबलैर्विपक्षः।
अतःप्रकर्षाय विधिर्विधेयः प्रकर्ष तत्रा हि रणे जयश्रीः।।
(अंक 3, श्लोक 17)





























































