सह्याद्रीची लेक जगातील उंच शिखरावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या महिन्यात रशियातील माऊंट एलब्रुस शिखर सर करणारे धनाजी लांडगे आणि त्यांची 12 वर्षांची लेक गिरिजा लांडगे या बापलेकीच्या जोडीने आणखी एक जागतिक शिखर सर करण्याचा पराक्रम केलाय. दोघांनी किलिमांजारोच्या 5895 मीटर शिखरावर स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकावला. लेक वाचवा- लेक जगवा असा जगजागृतीपर संदेश देत दोघांनी मोहीम फत्ते केली. या यशाबद्दल गिरिजा आणि धनाजी लांडगे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पिंपरी- चिंचवडच्या धनाजी लांडगे यांची लेक गिरिजा यांनी माऊंट किलिमांजारो मोहिमेची सुरुवात 11 ऑगस्टपासून केली होती. मोहिमेदरम्यान 1700 मीटर, 2700 मीटर, 3720 मीटर, 4700 मीटर अशी टप्प्पाटप्प्याने चार दिवसांत उंची गाठण्यात आली. या चढाईदरम्यान रोज नवीन प्रदेश आणि नवीन वातावरणाचा सामना करावा लागला. या सर्व आव्हानांचा सामना करत 15 ऑगस्टच्या पहाटे 1 वाजता शिखर माथ्याच्या मुख्य चढाईला म्हणजेच 4700 मीटरवरून 5895 मीटरच्या चढाईला सुरुवात केली. रात्रभर उणे 15 अंश ते 20 अंश असणाऱया थंड वातावरणात चढाई सुरू होती. आधी गिलमन पॉईंटस् नंतर स्टेला पिक मग सर्वोच्च शिखरमाथा गाठला, अशी माहिती लांडगे यांनी दिली.

सातवीत शिकणाऱया गिरिजाने आतापर्यंत सह्याद्रीतील लिंगाणा, वजीर, तैलबैल, नागफणी, कळकराय, वानरलिंगी असे अवघड सुळके सर केले आहेत. लिंगाणा, वजीर या सुळक्यांवर केलेल्या चढाईची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व युनिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये यंगेस्ट माऊंटनियरिंग म्हणून नोंद झाली आहे.

n माऊंट एल्ब्रुस आणि किलिमांजारो ही दोन्ही शिखरे अवघ्या 20 दिवसांमध्ये यशस्वीरीत्या सर करणारी गिरिजा ही जगातील पहिली मुलगी असल्याचा दावा तिच्या वडिलांनी केलाय.