क्रिकेटच्या काशीत यशाचं महारुद्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

क्रिकेटच्या काशी विश्वेश्वर मंदिरात विराटच्या संघाने यशाचं ‘महारुद्र’ केलं. इंग्लंडने विजयाच्या लख्ख उजेडात पराभवाचा अंधार शोधला. हिंदुस्थानने अमावास्येच्या रात्री पौर्णिमेचा चंद्र शोधला. हिंदुस्थानी गोलंदाजांनी आधी दर्जेदार फलंदाजांचं रूप घेऊन इंग्लिश गोलंदाजीची लक्तरं वेशीवर टांगली आणि मग त्या गोलंदाजीच्या लक्तरांना एकाकी वाटू नये म्हणून गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजीची लक्तरं त्यांच्यासोबत टांगली.

इंग्लिश क्रिकेटची लक्तरावस्था आमच्या अनेक जुन्या जखमांवर फुंकर मारून गेली. अकस्मात हिंदुस्थानी संघाचं शेपूट देवमाशाचं शेपूट बनलं, आणि आनंदाच्या लाटांवर हिंदकळणारी इंग्लिश क्रिकेटची बोट बुडवून गेलं. या सामन्यात पहिल्या दिवसापासून अपेक्षेपेक्षा वेगळय़ा गोष्टी घडत गेल्या.

इंग्लंडने टॉस जिंकून हिंदुस्थानला फलंदाजी दिली. का? तर आकाशात ढग होते. त्यांनी इंग्लिश गोलंदाजीला मदत करण्याऐवजी ते रोहित शर्मा आणि राहुलच्या नयनरम्य फलंदाजीत रमले. रोहित शर्मा हे फलंदाजीच्या सौंदर्याचं आजचं मधुबालाचं रूप आहे. आणि राहुल अशी फलंदाजी करतोय, की तो इंग्लंडमध्येच वाढलाय. त्यांनी घातलेला 126 धावांचा पाया महत्त्वाचा ठरला. त्यावर 364 धावांचं बांधकाम उभं राहिलं. गंमत पहा, त्यात शमी, ईशांत, बुमरा, सिराजचा वाटा किती होता, फक्त 8 धावा. पुढे वादळ जाऊदेत, थोडं वारं सुटणार आहे याचाही इशारा नव्हता.

इंग्लंडने पहिल्या डावात 391 धावा उभारल्या. पुन्हा एकदा त्यांचा तो रूट नावाचा श्रीकृष्ण बॅटवर धावांचा गोवर्धन घेऊन उभा राहिला. पण त्या डावातली अॅण्डरसनला टाकलेली बुमराची ओव्हर ही मॅच फिरवेल असं वाटलं नव्हतं. बुमराने अॅण्डरसनला उसळत्या चेंडूने सतावलं. पूर्वी तळाच्या फलंदाजांना बाउन्सर्स टाकायचे नाहीत हा अलिखित नियम होता. आता त्या गीतेतले श्लोक कुणी मनावर घेत नाहीत. काळ असा बदलला की, प्रतिपक्षावर बाउन्सर टाकायची ताकत हिंदुस्थानकडे आली. पूर्वी रमाकांत देसाई सांगत असे की, त्याचे कर्णधार परदेशी दौऱयावर त्याला प्रतिपक्षावर बाऊन्सर्स टाकायला देत नसत, कारण रमाकांतने दोन टाकले तर समोरून आठ येत. आता पठाणी व्याजाने वसुली होते.

मग मॅच इंग्लंडच्या खिशात जाते अस वाटलं. कारण हिंदुस्थानचे तीन खंदे फलंदाज ( राहुल, रोहित, विराट) माघारी परतले होते आणि 28 धावा खिशात होत्या. पण फासे पालटले. जे दोन फलंदाज निव्वळ अस्तित्वासाठी झगडत होते त्या पुजारा- रहाणेने शतकी भागीदारी केली. अनुभवाने, कष्टाने काढलेल्या धावांच रूप घेतलं. आणि मग लॉर्डस् कसोटीचा पाचवा दिवस हा संस्मरणीय वगैरे ठरला. हिंदुस्थानी विजयगीताची सुरुवात पंचम सुराने होईल असं वाटलं नव्हतं. मॅच वाचवण्याची आशा पंतवर होती.

पंत, ईशांत गेल्यावर हिंदुस्थानी संघ फक्त 182 धावांनी पुढे होता. इथून मॅच हिंदुस्थानने निव्वळ आक्रमक खेळून ताब्यात घेतली. हिंदुस्थानी खेळाडूंची शरीरं बोलली, जीभ बोलली, बॅट बोलली आणि मग चेंडू बोलला. त्या अॅण्डरसनवर टाकलेल्या बाउन्सर्सचा ते हिशेब चुकवायला गेले आणि आक्रमक विराटच्या हाती सापडले. शमी-बुमरा यांनी बाऊन्सरपुढे मान तुकवली नाही. मग कर्णधार रुटला क्षेत्ररचना पांगवावी लागली. त्याचा फायदा बुमरा-शमीला मिळाला. सरळ नेहमीचे डावपेच वापरले असते तर ते लवकर सापडले असते. एक तास त्याने अॅण्डरसनला वापरलं नाही. पहिल्या डावात त्यानेच शेपूट कचकन कापलं होतं. मायकेल वॉर्न म्हणाला ते खरंय. 54 कसोटींत नेतृत्व करणारा रूट शालेय क्रिकेट खेळला. त्यात विराटमधला अति आक्रमक माणूस जागा करायचा नसतो. मग तो चांगला कर्णधार होतो. तो लॉर्डस् नावाच्या मंदिराच्या ड्रेसिंग रूममधल्या बाल्कनीत उभा राहून उघड प्रोत्साहन देत होता. गांगुलीप्रमाणे त्याने शर्ट काढून फिरवला नाही. आणि त्याची गरज नव्हती. दोन हिंदुस्थानी गोलंदाज इंग्लिश गोलंदाजीचे कपडे उतरवतच होते. ‘ठकास भेटला महाठक’मध्ये कोहली नेहमी महाठक असतो. मग कोहली आणखी एक चांगला डावपेच खेळला. त्याने लंचला डाव सोडला नाही. थोडं खेळून सोडला. लंचला सोडला असता तर आघाडीच्या इंग्लिश फलंदाजांना विचार करायला वेळ मिळाला असता. त्याचा परिणाम काय झाला? दोन्ही आघाडीचे फलंदाज शून्यावर बाद झाले.

लॉर्डस्वर इंग्लंड आजपर्यंत 531 कसोटी सामने खेळला. त्यात त्यांचे दोन्ही फलंदाज एकाच डावात शून्यावर बाद व्हायची पहिलीच वेळ. अलीकडे इंग्लिश फलंदाजांना शून्याची सवय झालीय. गेल्या पॅलेंडर वर्षात वरचे चार फलंदाज 17 वेळा शून्यावर बाद झाले आहेत.

जेव्हा हरायची भीती नसते तेव्हा कर्णधार आक्रमक क्षेत्ररचना करू शकतो. आक्रमक गोलंदाजी टाकू शकतो. पण जेव्हा 60 षटकांत जिंकायची आशा नसते तेव्हा आजच्या पिढीच्या फलंदाजांना शेवटच्या दिवशी मॅच वाचवायला ती षटपं सुद्धा कठीण जातात. हिंदुस्थानने मॅच जिंकली तेव्हा 49 चेंडू शिल्लक होते आणि 3 झेल सोडायची चैन हिंदुस्थानी संघ करू शकला.

कारण आपल्याला फक्त एकच बळी हवा होता, जो रूटचा. ते मूळ तुटल्यावर झाड पडणारच होतं. बुमरा-सिराजने अप्रतिम गोलंदाजी टाकली. रूट सोडला तर थोडा प्रतिकार रॉबिन्सन, बटलरने केला. पण कोहलीने यावेळी डीआरएसचा उत्तम उपयोग करून ती जोडी फोडली, आणि मग सिराजने इंग्लंडला शेपूट कसं गुंडाळायचं ते दाखवलं.

ऑस्ट्रेलियापासून एक गोष्ट आपण अनुभवतोय, हिंदुस्थानी संघ पराभवाचे ढग जमले तर खचत नाही. तो मुरारबाजी होऊन लढतो. डोकं कापलं गेलं तर शरीर लढतं. इथे तो धडावर डोपं शाबूत ठेवून लढला आणि जिंकला. त्यांचं नाव फक्त वेगळं असतं. यावेळी कधी बुमरा होतं, कधी शमी, तर कधी सिराज.