अनिल देशमुख ‘ईडी’समोर पाचव्यांदा गैरहजर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ‘ईडी’ने पाचव्यांदा समन्स पाठवत 18 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, आजदेखील देशमुख चौकशीसाठी ‘ईडी’समोर हजर झाले नाहीत. दरम्यान, सीबीआयने दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी सर्वेच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळल्याने देशमुख यांच्यापुढील अडचणीत वाढ झाली आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या कारवाईमध्ये ईडीने आतापर्यंत देशमुख यांचे हॉटेल, कॉलेज, घर अशा सर्वच ठिकाणी छापेमारी केली आहे. देशमुख यांना ईडीने आतापर्यंत 5 समन्स बजावले आहेत. मात्र, आजही देशमुख आले नाहीत. त्यांनी त्यांचे वकील इंदरपाल सिंग यांना निवेदन घेऊन पाठवलं होतं. मनी लॉण्डरिंग प्रकरणात सर्वेच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल आहेत. त्याच्याशी आमची याचिका जोडली गेली आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत समन्स पाठविले जाऊ नये, अशी विनंती देशमुख यांनी केली आहे.

न्यायालयाचा निकाल येईपर्यंत ईडीने थांबावं

आम्ही ईडीला काही काळ वाट पाहण्यास सांगितले आहे. सर्वेच्च न्यायालयात यासंदर्भात आम्ही याचिका दाखल केली आहे. सर्वेच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत थांबावं, अशी भूमिका मांडणारं पत्र आम्ही ईडीला दिलं आहे. तपासामध्ये आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत, असं देशमुख यांचे वकील इंदरपाल सिंग यांनी स्पष्ट केलं आहे.