
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सेटवरही हे सर्व कलाकार अगदी गुण्यागोविंदाने नांदतात. शूटिंगचा बराचसा वेळ सेटवरच जात असल्यामुळे सेट हा कलाकारांसाठी दुसरं घरच आहे. या मालिकेचा सेट फळं आणि फुलांच्या मळ्याने सजला आहे.
सेटवर शूटिंगसाठी आणल्या जाणाऱया भाज्या फेकून न देता त्यातल्या बियांपासून सेटवरची ही बाग दिमाखात सजली आहे. सेटवरची सर्वच मंडळी या बागेची काळजी घेतात. त्या झाडांना खतपाणी घालतात. हिरवीगार बाग पाहून तर आता बियाणं आणून त्याची छोटीशी शेती केली जातेय. हे सर्वच खूप भारावून टाकणारं आहे. या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी रूपाली भोसले म्हणाली, मला आणि माझ्या आईला झाडांची लागवड करायला खूप आवडतं. माझ्या घरी सर्व सिझनल भाज्या आणि फुलांची झाडं आम्ही लावली आहेत. त्यामुळे सेटवरदेखील अशीच झाडं आमच्या टीमने लावली आहेत. सेटवर आम्ही सेंद्रिय भाज्यांचा आस्वाद घेतो. कधी गरमागरम वांग्याच्या भरीताचाही बेत असतो.
पुढे ती म्हणाली, शूटिंगची सुरुवात नेहमी बाप्पाच्या आशीर्वादाने होते. त्यामुळे बाप्पा चरणी सेटवरच्याच जास्वंदीच्या झाडाचं फूल असतं. त्यामुळे सेटवरचं वातावरण अतिशय प्रसन्न करणारं आहे. निसर्गाचं महत्त्व आपल्या सर्वांनाच कळतंय. त्यामुळे सेटवरचा हा नजारा काम करण्यासाठी सर्वांनाच नवी ऊर्जा देतो.




























































