
राज्यात कोविडचा संसर्ग उतरणीला लागला असला तरी संभाव्य तिसऱया लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे तिसऱया लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 22 कोटी 50 लाख रुपयांची रॅपिड अँटिजन टेस्ट किट खरेदी करण्यात येणार आहेत.
राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 96. 87 टक्क्यांवर आहे. त्यामुळे अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्यातील निर्बंधातून आता सूट देण्यात सुरुवात झाली आहे. पण सप्टेंबर महिनाअखेरपर्यंत कोरोनाच्या तिसऱया लाटेचा धोका वैद्यकीय तज्ञांनी वर्तवला आहे. त्यातच आता उत्सवांचा काळ सुरू होत असल्यामुळे संसर्ग वाढीला लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे राज्य सरकारने एकीकडे आवाहन केले आहे तर दुसरीकडे वैद्यकीय सुविधा वाढवण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. कोविड सेंटरमधील सुविधा वाढवण्यास सुरुवात करण्यात आली असून आक्सिजनबाबत सर्व रुग्णालयांना स्वयंपूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कोविड चाचण्यांवरही भर देण्याची तयारी सुरू केली आहे.
































































