
>> विवेक दिगंबर वैद्य
निसर्ग आणि देवालयाचा अनोखा संबंध जोडणारे आमनायेश्वर एक स्थान ‘श्रीआमनायेश्वर’ या नावाने प्रसिद्ध आहे. संगमेश्वर-चिपळूण स्थानावर बुरंबाड येथे श्रीआमनायेश्वर वास्तव्य करून आहे. पूर्वी या भागात आमणीच्या झाडांचे जंगल होते म्हणून आमणीच्या झाडांमध्ये वास्तव्य केलेल्या श्रीशंभुदेवाला इथले भाविक ‘‘श्रीआमनायेश्वर’ म्हणूनच ओळखू लागले. हे प्राचीन देखणे शिवालय तळय़ाच्या काठावर वसलेले आणि पाहताक्षणीच आपल्या तसेच इथे येणाऱया प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेणारे आहे.
नितांत रमणीय कोकण प्रांतातील, श्रीकर्णेश्वर, श्रीमार्लेश्वर, श्रीआमनायेश्वर, श्रीसोमेश्वर, श्रीटिकलेश्वर, श्रीखडगेश्वर आदी शिवालये संगमेश्वर आणि देवरुख परिसराची स्फूर्तिस्थाने आहेत. गिरीशिखरे, दऱयाखोरे व घनगर्द वनराईचे अखंड साहचर्य लाभलेली ही शिवस्थाने श्रीशंभुमहादेव नामक पुराणपुरुषाची सर्व गुणवैशिष्टय़े एकवटलेल्या दृश्य प्रतिमा आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
कर्णराजाने निर्मिलेल्या शिवमंदिराचे ‘कर्णेश्वर’ हे नाव यथार्थ आहे याचे कारण कोकण प्रांतातील मोजक्या शिल्पसमृद्ध मंदिरामध्ये कर्णराजाने निर्माण केलेले ‘कर्णेश्वर’ हे सर्वात सुंदर शिवालय आहे. बाहेरून या वास्तूचे श्रीमंती वैभव जाणवत नसले तरीदेखील मंदिरात प्रवेश केला असता सभामंडप, खांब, मुखमंडपाचे छत आणि घुमट आदी ठिकाणी अप्रतिम नक्षीकाम केल्याचे पाहावयास मिळते. ‘कर्णेश्वर’ हे शिवालय दगडी बांधणीचे आणि पाचेक फूट उंचीच्या जोत्यावर उभारलेले आहे. या जोत्यावरून मंदिरास बाहेरून प्रदक्षिणा घालता येते.
‘कर्णेश्वर’ शिवालयात पूर्वेकडून प्रवेश केल्यास मुखमंडपाच्या पायऱयांपाशी डावीकडे सिंहासोबत आणि उजवीकडे नंदीसह शिवप्रतिमा दिसून येते. सभामंडपातील दगडी शिळेवर नंदीचे अधिष्ठान आहे. नऊ भागांत विस्तारलेला इथला सभामंडप ‘नवरंग मंडप’ या नावाने ओळखला जातो. मंडप खांबावर मंदिराचे वजन तोलण्याच्या आविर्भावात असलेल्या देवदेवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. यात गंधर्व, गणेश, नरसिंहादी प्रतिमा आहेत. सभामंडपाच्या कोनाडय़ात अनंतविष्णू-सरस्वती आणि ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. गाभाऱयानजीक गद्धेगाळ ठेवलेला आहे. या शिवालयाच्या मुखमंडपात छतावर कोरीव नक्षीकाम केले असून मध्यभागी वर्तुळाकार घुमट व दगडी झुंबर आहे. अशा प्रकारचे आकर्षक दगडी झुंबर अन्यत्र क्वचितच पाहावयास मिळते. या शिवालयाचे वैशिष्टय़ म्हणजे, येथे काही भाग कोरीव नक्षीयुक्त तर काही निव्वळ सपाट, शिल्पकाम नसलेला आहे. शिल्पसमूहाची रेलचेल सर्वत्र आढळत नाही. त्यावरून हे मंदिर पूर्णावस्थेत बांधलेले नाही व बरेचसे काम अर्धवट राहिले असावे असे वाटत राहते. कर्णेश्वर शिवालयापाशी श्रीलक्ष्मीनृसिंह देवालय आहे. या दोन्ही मंदिरांच्या रूपाने येथे शिव आणि विष्णू अर्थात हरिहर या देवतांचे एकत्रित साहचर्य अनुभवावयास मिळते. याच परिसरामध्ये श्रीकाळभैरव, श्रीकार्तिकस्वामी, श्रीसंगमेश्वर, श्रीसोमेश्वर आणि श्रीकाशीविश्वेश्वर यांची पुरातन मंदिरे पाहावयास मिळतात. पर्यटकांना, वास्तुशिल्पे आणि प्राचीन मंदिराच्या स्थानमहात्म्यांचा शोध घेणाऱया अभ्यासकांना श्रीकर्णेश्वराचा हा परिसर नक्कीच भुरळ घालणारा आहे.
निसर्ग आणि देवालयाचा अनोखा संबंध जोडणारे आणखी एक स्थान ‘श्रीआमनायेश्वर’ या नावाने प्रसिद्ध आहे. संगमेश्वर-चिपळूण स्थानावर बुरंबाड येथे श्रीआमनायेश्वर वास्तव्य करून आहे. पूर्वी या भागात आमणीच्या झाडांचे जंगल होते म्हणून आमणीच्या झाडांमध्ये वास्तव्य केलेल्या श्रीशंभुदेवाला इथले भाविक ‘श्रीआमनायेश्वर’ म्हणूनच ओळखू लागले. हे प्राचीन देखणे शिवालय तळय़ाच्या काठावर वसलेले आणि पाहताक्षणीच आपल्या तसेच इथे येणाऱया प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेणारे आहे.
हे देवालय मूळ द्वापारयुगात, पांडवांनी बांधल्याचे सांगितले जाते. पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधून काढले असा प्राचीन इतिहास सांगताना मूळ मंदिर पांडवकालीन, मंदिराचा मध्य भाग शिवकालीन आणि सुरुवातीचा भाग सद्यकालीन आहे असल्याचे सांगण्यात येते. सध्याचे मंदिर हे मूळ मंदिराच्या जिर्णोद्धारीत स्वरूपात पाहता येते. दुसऱया एका कथेनुसार, एका ब्राह्मणाची गाय चरावयास गेली असता एका विवक्षित ठिकाणी पान्हा सोडत असे. हे पाहून चक्रावलेल्या त्या ब्राह्मणाने एके दिवशी पाळत ठेवून जिथे गाय आपला पान्हा सोडत होती तिथे हातातील कुऱहाडीचा घाव घातला तेव्हा तिथल्या दगडाचा कळपा नदीकाठी कातळावर पडला आणि ‘श्रीकळपेश्वर’ या नावाने प्रसिद्ध झाला. दुसरा भाग जवळच्याच कळंब गावात पडला आणि ‘श्रीकळंबेश्वर’ नावाने प्रसिद्ध झाला आणि दगडाचा मध्यभाग बुरंबाड येथेच राहिला. मात्र, जिथे घाव पडला तिथून रक्त वाहू लागले हे पाहून भयभीत झालेल्या त्या ब्राह्मणाने क्षमायाचना करताच दगडातून रक्त वाहणे थांबले. पुढे हाच दगडी मध्यभाग शिवतेजस्थान म्हणून पुजनीय झाला आणि ‘श्रीआमनायेश्वर’ म्हणून प्रसिद्धीस आला.
याच ठिकाणी पुढे काही काळाने वनवास भोगत असलेल्या पांडवांनी मंदिर बांधले आणि ‘श्रीआमनायेश्वर’ स्थानास मंदिराचे स्वरुप आणले. असो. ‘श्रीआमनायेश्वर’ या शिवस्थानाच्या निर्मितीमागील आख्यायिका कोणत्याही असो, मात्र हे शिवालय नैसर्गिक पार्श्वभूमीवर विशेष खुलून दिसते आणि हेच त्याचे आकर्षण आहे. श्रीआमनायेश्वराच्या पिंडीवर अभिषेक करताना पाण्याचा विशिष्ट नादमय आवाज येतो आणि गाभाऱयाभर हळुवारपणे घुमतो. मंदिराचे बांधकाम अप्रतिम व कोरीव अशा शिल्पाकृतींनी सजलेले आहे. या शिल्पांमध्ये गंडभेरूड पक्षी, पाचमुखे व एक धड असलेली गोमाता या आणि अशा अनेक विचित्र संकल्पना असलेल्या शिल्पप्रतिमा पाहावयास मिळतात.
दररोज त्रिकाळ पूजा होणाऱया या ‘श्रीआमनायेश्वर’ शिवस्थानावर महाशिवरात्र, त्रिपुरी पौर्णिमा तसेच श्रावणातील सोमवारी शिवभक्तांची अपार गर्दी उसळते. तलावाच्या काठावर वसलेले हे प्राचीन शिवालय नेत्रसुखद व चित्तवृत्ती शांत करणारे स्थान आहे. संगमेश्वर-देवरुख परिसरात फिरताना नैसर्गिक शांतता अनुभवता येते. इथला डोळे सुखावणारा निसर्ग, हिरवीगार वनश्री, आल्हाददायक गारवा चित्तशांती करणारा असला तरीदेखील दुर्दैवाने प्राचीन वारसा लाभलेल्या या परिसराला दुःखाच्या लसलसत्या किनारीची साथ आहे ती श्रीशिवपुत्र संभाजीराजांविषयी झालेल्या दगाबाजीची. कसबा-संगमेश्वर प्रांतात मुघल सरदार मकर्रबखान याने कपटनीती आणि दगाबाज एतद्देशीयांच्या मदतीने याच प्रांतात श्रीशंभूराजांना पकडले आणि येथूनच त्यांच्या आयुष्यातील सर्वात दुर्दैवी अशा अंतिम प्रसंगाला सुरुवात झाली.
n [email protected]





























































