
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यावर खालच्या स्तरावरील टीका करत त्यांना सांड म्हणणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे बेताल वक्तव्ये करत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आम्ही आदर करतो. त्यांना दानवे यांनी बैल म्हणले आहे. हा पंतप्रधानांचा अपमान आहे. ज्या पंतप्रधानाना विकासपुरूष म्हणून संबोधतात, त्यांना बैल म्हणणाऱ्या रावसाहेब दानवे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. ते रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करणारे बैल आहेत, तर राहुल गांधी हे सांड आहेत अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती.त्या टीकेला खासदार विनायक राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. राऊत म्हणाले की, केंद्रातील भाजप मंत्री बेताल वक्तव्ये करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बैल म्हणाऱ्या दानवेंची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करा, अशी मागणी राऊत यांनी केली.
जनआशीर्वाद यात्रेतून तिसऱ्या लाटेला निमंत्रण
जनआशीर्वाद यात्रा म्हणजे भाजपचे नाट्य आहे. वाढलेली महागाई, जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी पंतप्रधानांनी जनआशीर्वाद यात्रा काढण्याची सूचना मंत्र्यांना केली होती. राणे मात्र बेंजो, गाजावाजा करत हारतुरे स्वीकारत आहेत. जनआशीर्वाद यात्रेतून नारायण राणे कोकणात कोरोनाची तिसरी लाट आणत आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची टीका नारायण राणेनी केली होती त्यालाही विनायक राऊत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की एकनाथ शिंदे यांचे मंत्री म्हणून चांगले काम आहे. शिवसेना संघटना मजबूत करण्यात त्यांचे उत्तम काम आहे. त्यांच्या कामाचा आम्हाला अभिमान आहे. नगरविकास खात्यात एकनाथ शिंदे यांनी चांगले निर्णय घेतले आहेत. मात्र, राणे यांना मंत्री म्हणून पंतप्रधानांनीच काही अधिकार दिले नसतील म्हणून स्वानुभवातून राणे टीका करत असावेत, असा टोला विनायक राऊत यांनी हाणला.
























































