महावितरणला 4500 मेगावॅट वीज स्वस्तात मिळणार, प्रतियुनिटचा दर 2 रुपये 42 पैसे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महावितरणला आता 4615 मेगावॅट वीज स्वस्त दराने मिळणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्पात तयार होणाऱया एक हजार मेगावॅट विजेच्या खरेदीसाठी महावितरणने नुकतेच स्पर्धात्मक निविदांच्या माध्यमातून टेंडर काढले होते. त्याला सौर ऊर्जा निर्मिती कंपन्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून 4 हजार 615 मेगावॅट वीज प्रतियुनिट केवळ 2 रुपये 42 पैसे दराने पुरवण्यास सहमती दर्शवली आहे. पुढील दीड वर्षात सदरचे ऊर्जा प्रकल्प उभारून प्रत्यक्ष वीज निर्मिती होऊ शकणार आहे. त्यामुळे विजेचे दर कमी होऊन राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

राज्यात पुढील पाच वर्षांत 17 हजार मेगावॅटचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबतचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या पार्श्वभूमीवर महावितरणने जास्तीत जास्त वीज सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पातून खरेदी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून महावितरणने 500 मेगावॅट वीज सौर ऊर्जा प्रकल्पातून तर 500 मेगावॅट हायब्रीड सौर-पवन ऊर्जा प्रकल्पातून घेण्याबाबत टेंडर काढले होते. त्याला राज्याबरोबरच देशभरातील वीज कंपन्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला असून सौर प्रकल्पातून 3165 मेगावॅट प्रतियुनिट 2 रुपये 42 पैसे दराने तर हायब्रीड सौर-पवन ऊर्जा प्रकल्पातून 2 रुपये 62 पैसे दराने वीज पुरवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे या प्रकल्पातून वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर महावितरणचा वीज खरेदीवरील खर्च कमी होणार असल्याने ग्राहकांनाही स्वस्तात वीज उपलब्ध होऊ शकणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

आतापर्यंतचा सर्वात कमी वीज दर

महावितरण गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज खरेदीसाठी टेंडर मागवत असून प्रतियुनिटचा 2 रुपये 42 पैसे हा आतापर्यंतचा सर्वात कमी वीज दर ठरला आहे. सुरुवातीला प्रतियुनिटचा सात रुपयांपेक्षा जास्त असलेला दर टप्प्याटप्प्याने खाली आला असून डिसेंबर 2018मध्ये वीज कंपन्यांनी पावणेतीन रुपये प्रतियुनिट दराने वीज पुरवण्याची तयारी दर्शवली होती. नोव्हेंबर 2019मध्ये 2 रुपये 89 पैसे, डिसेंबर 2019मध्ये 2 रुपये 90 पैसे एवढा वीज दर प्राप्त झाला होता.