
कोरोनासारख्या महाभयंकर महामारीतही जीवाची पर्वा न करता समाजाची अविरत सेवा करत कर्तव्य बजावणारा दलित सफाई कामगार घर, वारस हक्क, रोजगार तसेच अनेक सामाजिक हक्कांपासून लाखो कामगार उपेक्षित आहे. त्यामुळे त्याला न्याय देण्यासाठी सरकारने महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग स्थापन करावा, अशी मागणी अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायतने केली आहे. कोरोना असो की, भूकंप, वादळ, महापूर असो स्वत:चा जीव धोक्यात घालून सफाई कामगार हा समाजाची सेवा एक कर्तव्य असल्याप्रमाणे बजावत आहे. कोरोना काळात तर अत्यावश्यक सेवेतील एक अत्यावश्यक घटक म्हणून काम करत आहे. अशा या दलित सफाई कामगार समाजासाठी, त्यांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाची स्थापना करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायतचे राष्ट्रीय सचिव राजेश टाकेकर यांनी केली आहे.



























































