गमती जमतीतून नवीन दृष्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mrunmai bhajak

>>प्रितम पाथरे

‘चुटकीभर गंमत’ हे डॉ. मृण्मयी भजक लिखित पुस्तक हातात पडलं तेव्हाच त्या पुस्तकाप्रति उत्सुकता जागृत झाली. त्याची दोन कारणं एक म्हणजे त्याचं शीर्षक आणि दुसरं म्हणजे पुस्तकाचं मुखपृष्ठ.

मुखपृष्ठाचा हलका निळसर रंग, त्यात विहरणारे ढग, बागडणारी फुलपाखरं आणि हे सर्व प्रसन्नपणे तोलणारी एक स्त्री हे पाहून पटकन पुस्तक वाचायला सुरुवात केली. ‘त्रिकोणी पोळी’, ‘सममिती’, ‘स्नेहाचं झाड’, ‘मायेचं सूत’, ‘मातीतली गंमत’ असे एक एक लेख वाचत असताना असंख्य प्रसंग, घटना आयुष्यातल्या घडलेल्या गोष्टी मनःपटलावर तरळून गेल्या. पावसाळा, परसबागेतील झाडं, सायकल असे साधे साधे विषय काही लेखांमध्ये हाताळले आहेत. तर काही साधेच वाटणारे, पण लेखात येऊ शकतील अशी कल्पनाही केली जाणार नाही असे विषयही लेखिकेने मोठ्या खुबीने हाताळले आहेत.

या लेखनामध्ये सापडणारा नर्मविनोदाचा धागा मला खूप महत्त्वाचा वाटतो. कधी कधी आपण आपल्या आयुष्यातील काही गोष्टींना, घटनांना नावे ठेवत असतो. हे पुस्तक वाचून अशा गोष्टींकडे विनोदी दृष्टिकोनातून पाहण्याची ‘गंमतनजर’ आपल्याला मिळते असं म्हणावसं वाटतं. ‘गंमतशीर माणसं’, ‘रागाची गंमत’, ‘नाच गं घुमा’, ‘स्माईल प्लिज’ अशा लेखांमधून ही दृष्टी आपल्याला मिळते. ‘तुला एवढंही कसं जमत नाही’, ‘दुसऱ्यांच्या बुटातून’ असे लेख जरा खोल जाऊन मानसशास्त्राचा वेध घेणारे लेख आहेत.

वरकरणी जरी हे लेखन म्हणजे सगळी गंमत वाटली तरी, यात मानसशास्त्र, व्यवस्थापन, मुलांचे भावविश्व, नव्या जुन्या पिढीतील विचारांचा समन्वय, सकारात्मकता, काही अनवट माहिती असे अनेक पैलू अलगदपणे हाताळले गेले आहेत. लेखिका डॉ. मृण्मयी भजक या स्वतः एक डॉक्टर आहेत. स्टेज, दूरचित्रवाणीवर काम करणाऱ्या निवेदिका आहेत आणि प्रशिक्षक आहेत. या सर्व क्षेत्रातील समृद्ध अनुभव लेखांमध्ये प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे उतरताहेत असं पुस्तक वाचताना वाटतं.
‘गिफ्ट आगळंवेगळं’ ही एका तरुण मुलीची छोटीशी गोष्ट आहे. ही मुलगी स्वतंत्र आहे. स्वतःच्या जिद्दीवर, मेहनतीवर तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यात तिला चांगलं यशही मिळालंय. पण तिला हवं ते मिळूनही तिला एकटं वाटतंय. तिचा आनंद, तिचं कर्तृत्व सिद्ध झालं असूनही तिच्या कुटुंबाकडून किंवा कुणाकडूनही तिला साधी कौतुकाची थाप मिळत नाहीये. अशी घटना, अनेक स्त्री-पुरुषांच्या आयुष्यात घडू शकते. पण या गोष्टीला लेखिकेने जे उत्तर दिलं आहे, ते वाचून गोष्टीतील ‘प्रेरणा’ या मुलीबरोबर वाचकही सुखावून जातो.

कविवर्य अरुण म्हात्रे याची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे. हे पुस्तक करिअर करणाऱ्या स्त्रिया, पुरुष, व्यावसायिक, गृहिणी, विद्यार्थी अशा सर्वांना हसत हसत अंतर्मुख करणारं आणि नवी दृष्टी देणारं आहे. विशेषतः आताच्या निराशाजनक वातावरणात मनाला उभारी देणाऱ्या या पुस्तकाचं वाचकांकडून नक्कीच स्वागत होईल.

चुटकीभर गंमत
लेखिका – मृण्मयी भजक
प्रकाशक – ग्रंथाली
पृष्ठs – 147, मूल्य – रुपये 200/-