तुमच्या देशात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करू, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही वर्षांपासून दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱया पाकिस्तानला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी सज्जड दम भरला. ‘सध्या एक देश दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत आहे. पण हिंदुस्थान आपल्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नसून गरज पडल्यास तुमच्या देशात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करू,’ असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी पाकिस्तानचे नाव न घेता दिला.

तामीळनाडू येथील वेलिंग्टनच्या डिफेन्स सर्व्हिस स्टाफच्या कॉलेजने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हजेरी लावली. त्यावेळी बोलताना त्यांनी वरील इशारा दिला. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानच्या सद्यस्थितीबाबतही भाष्य केले.

यावेळी संरक्षणमंत्री म्हणाले की, अफगाणिस्तान येथील सध्याची परिस्थिती आपल्यासाठी आव्हानात्मक आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे आपल्याला पुन्हा विचार करायला लावला असून आपण लवकरच आपल्या रणनीतीमध्ये बदल करणार असून त्यावर लवकरच चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. चीनकडून हिंदुस्थानात दाखल होण्याचा प्रयत्न केला जात होता, पण आपल्या सैन्यांनी त्यांना चोख उत्तर दिल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

काय म्हणाले राजनाथ सिंह

  • आज हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धबंदीचा जो करार झाला आहे तो आपल्या ताकदीमुळे झाला आहे. 2016 साली पाकिस्तानकडून क्रॉस बॉर्डर स्ट्राइक्सचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र त्याला आपण जोरदार विरोध केला. त्यानंतर 2019 मध्ये बालाकोट येथे करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकनंतर त्यास आणखीन बळ मिळाले आहे.
  • हिंदुस्थान आपल्या भूमीत दहशतवाद्यांना स्थान देणार नाही. पण जर दुसऱयांच्या भूमीत जाऊन दहशतवाद्यांचा नायनाट करण्याची वेळ आली तर आम्ही मागे-पुढे पाहणार नाही. आज हिंदुस्थानची ताकद वाढली असून हिंदुस्थान आपल्या देशात राहूनदेखील हल्ला चढवू शकतो तर दुसऱयांच्या भूमीत घुसूनदेखील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास आम्ही सक्षम आहोत.