ठसा – आनंद अंतरकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मेधा पालकर

‘हंस’, ‘मोहिनी’ व ‘नवल’ या साहित्यिक अंकांचे साक्षेपी संपादक आणि लेखक आनंद अंतरकर यांच्या जाण्याने अनुभवी तसेच नवोदित लेखकांच्या कसदार साहित्याने नटलेल्या मुद्रित मराठी नियतकालिकांचे एक अनोखे पर्व संपुष्टात आले आहे.

शेवटच्या क्षणापर्यंत ते दिवाळी अंकांची कामे निष्ठsने आणि जिद्दीने करत होते. हॉस्पिटलमधे जाण्यापूर्वी आनंद अंतरकरांनी यंदाच्या दिवाळी अंकांचे काम बव्हंशी पूर्ण केले होते. 75 वर्षांच्या परंपरेनुसार तिन्ही नियतकालिकांचे या वर्षीचे दिवाळी अंकसुद्धा वाचकांपर्यंत पोचणार आहेत, अशी ग्वाही अभिराम अंतरकर यांनी दिली. उत्तम सजावट आणि आपले वडील अनंत अंतरकर यांच्या पश्चात ‘हंस’, ‘मोहिनी’ आणि ‘नवल’सारख्या ख्यातनाम मासिकांच्या संपादनाची धुरा 55 वर्षे यशस्वीपणे सांभाळली. त्यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1941 साली-मुंबईत झाला. पुढे पुण्यात त्यांनी अभिनव कला विद्यालयात शिक्षण जी. डी. आर्ट (कमर्शिअल) पूर्ण केले.

वडिलांच्या ‘हंस प्रकाशन’ या संस्थेत संपादनाचे संस्कार घेत नियतकालिकांच्या संपादनाची 7 वर्षे उमेदवारी (1959 ते 1966) केली. 1966 साली वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर ‘हंस’ ‘मोहिनी’ आणि ‘नवल’ या विविध मासिकांच्या प्रत्यक्ष संपादनाची धुरा सांभाळली. आनंद अंतरकरांना लहानपणापासूनच साहित्याची आवड होती. संपादनाचे कार्य संभाळता संभाळता त्यांना लेखनाची रुची जडली. इंग्रजी हिंदी कथांचे अनुवाद, स्वतंत्र कथालेखन, ललित कथालेखन आदी प्रकारच्या साहित्याचे गेली जवळपास 25 वर्षे लेखन केले. ‘झुंजुरवेळ’ आणि ‘रत्नकीळ’ ही पहिली दोन ललित पुस्तके प्रकाशित झाल्यावर लेखक म्हणून मान्यता मिळू लागली. ‘छायानट’ हे त्यांनी स्वतः काढलेल्या छायाचित्रांशी निगडित आठवणींवर पुस्तक प्रसिद्ध झाले. जी. ए. कुलकर्णी यांच्याबरोबरच्या पत्रव्यवहारावर आधारित एक धारवाडी कहाणी ही ललितकृती प्रकाशित केली. ‘अंतर्नाद’ मासिकामधे वर्षभर ‘अक्षरछाया’ सदर लेखन केले. ‘घूमर’ आणि ‘सेपिया’ (व्यक्तिचित्रण) ही त्यांची अलीकडच्या काळातील 2 लक्षवेधी पुस्तके ठरली. अभिरुचीसंपन्न, विनोदी, रहस्यमय अशा सर्व प्रकारच्या, मध्यमवर्गीय वाचकांच्या गरजा वर्षानुवर्षे या तीनही नियतकालिकांनी भागवल्या आहेत. ‘हंस’ने वाङ्मयीन दर्जा म्हणजे काय याचे मध्यमवर्गाला भानही आणून दिले. चित्रपटविषयकही जाण जपली गेली. महत्त्वाच्या कवींच्या कविता ‘हंस’मधून प्रकाशित झाल्या आहेत. ‘मोहिनी’मधून व्यंगचित्रे, विनोद, विनोदी साहित्य विशेषत्वाने पोहचवले गेले. या तीनही नियतकालिकांचे दिवाळी अंक हे तर मराठी दिवाळी अंक संस्कृतीचे भूषण ठरले आहेत. अंतरकरांची संपादन दृष्टी त्यामागे होती. पुढच्या त्यांच्या पिढीनेही तो वारसा जपला आहे. त्यांचे कुटुंबीय हे तिन्ही अंक वेळेत बाजारात आणून पंचाहत्तर वर्षांचा बहुमोल वारसा चालूच ठेवणार आहेत. अंतरकरांनी आपल्या मासिकांद्वारे अनेक लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि वाचकांची अभिरुची समृद्ध करण्याचेही काम केले. हे योगदान खूप महत्त्वाचे आहे.