
ओव्हल येथे चौथा कसोटी सामना खेळत असलेल्या टीम इंडियाला रविवारी धक्का बसला. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हिंदुस्थानी क्रिकेट संघातील रवी शास्त्रीसह तीन जणांना विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. यामध्ये गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर व फिजिओथेरेपिस्ट नितीन पटेल यांचा समावेश आहे. रवी शास्त्री हे पुस्तक अनावरणाच्या कार्यक्रमाला गेल्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असे वृत्त मीडियामधून समोर आले आहे.
मेडिकल टीमचे लक्ष
रवी शास्त्री, भरत अरुण, आर. श्रीधर व नितीन पटेल यांचे आरटीपीसीआर परीक्षण करण्यात आले आहे. तसेच या चौघांनाही हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. मेडिकल टीम या चौघांवर लक्ष ठेवून आहे. मेडिकल टीमकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच या चौघांना टीम इंडियासोबत राहता येणार आहे.
खेळाडूंची टेस्ट निगेटिव्ह
रवी शास्त्री यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सपोर्ट स्टाफसह टीम इंडियातील खेळाडूंचीही टेस्ट करण्यात आली. शनिवारी रात्री तसेच रविवारी सकाळी खेळाडूंची टेस्ट करण्यात आली. या चाचणीत ज्या खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे त्या खेळाडूंना ओव्हल कसोटीत खेळण्याची संधी देण्यात आली आहे.
मंगळवारी मँचेस्टरला रवाना होणार
हिंदुस्थान – इंग्लंड यांच्यामध्ये ओव्हल येथे चौथी कसोटी सुरू आहे. सोमवारी या कसोटीचा अखेरचा दिवस असणार आहे. त्यानंतर मंगळवारी टीम इंडियाचा चमू मँचेस्टर येथील पाचव्या कसोटीसाठी रवाना होईल. रवी शास्त्रीसह सपोर्ट स्टाफमधील तिघांची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांना हॉटेलमध्ये 10 दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. तसेच दोनवेळा टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच या सर्वांना टीम इंडियासोबत वास्तव्य करता येणार आहे, पण चौघांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांच्यासाठी हा दौरा संपल्यासारखेच असणार आहे.






























































