
प्रत्येकाच्या हाती मोबाईल आणि लिखाणासाठी संगणकाचे कीबोर्ड असणाऱ्या जमान्यात हाताने सुंदर, वळणदार अक्षर काढणे म्हणजे किमयाच जणू. ही किमया साधत लक्ष्मण बावनकुळे यांनी सातासमुद्रापार मोत्यासारख्या अक्षरांचा झेंडा फडकवला आहे. अमेरिकेतील हस्ताक्षर स्पर्धेत बावनकुळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबद्दल बावनकुळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
न्यूयॉर्क शहरात ऑल्बेनी येथे ऑनलाइन वर्ल्ड हॅण्डरायटिंग कॉन्टेस्ट 2021 नुकतीच झाली. कर्सिव्ह, मॅन्युस्क्रिप्ट, आर्टिस्टिक या तीन प्रकारांमध्ये स्पर्धा होती. त्यातील आर्टिस्टिक हस्ताक्षर गटात 33 वर्षीय लक्ष्मण बावनकुळे यांनी पहिला क्रमांक पटकावला. 2019 सालच्या स्पर्धेतही त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. लक्ष्मण सांगतात, मला अभियांत्रिकी करत असताना जागतिक हस्ताक्षर स्पर्धेबद्दल माहिती मिळाली आणि मग मी त्यासाठी प्रयत्न सुरू केले. मग दोन वेळा या स्पर्धेमध्ये भाग घेतला, पण यश आले नाही. त्यानंतर सतत हस्ताक्षरात सुधारणा करत यश मिळवले. मौदा नागपूर येथील बावनकुळे कोराडी येथील औष्णिक विद्युत केंद्रात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत आहेत.
ऑनलाइन वर्ल्ड हॅण्डरायटिंग कॉन्टेस्ट स्पर्धेत मी आर्टिस्टिक या प्रकारात सहभाग घेतला. अक्षरांचा आकार, स्पेसिंग, रिदम, मार्ंजग आणि अन्य निकषांवर ही स्पर्धा होती. सध्या काही फॉण्ट्स तयार करतोय. हे फॉण्ट्स मायक्रोसॉफ्टच्या यादीत समाविष्ट करणे हे माझे ध्येय आहे.
– लक्ष्मण बावनकुळे

































































