
जेट एअरवेजची विमाने अडीच वर्षांच्या काळानंतर आता पुन्हा एकदा उड्डाण घेणार आहेत. आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेटने आपली सेवा 19 एप्रिल 2019 पासून थांबविली होती. 2022 च्या जानेवारी ते मार्चदरम्यान देशांतर्गत उड्डाणे सुरू केली जातील. तसेच सध्या परदेशी उड्डाणे केवळ कमी अंतराची असणार आहेत असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
जेट एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, ऑपरेटिंग फ्लाइटसाठी एअर ऑपरेटर प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रियाही सुरू आहे. यूएईचे व्यापारी मुरारीलाल जालान हे प्रस्तावित जेट एअरवेजचे गैर-कार्यकारी सदस्य आहेत. ‘आम्ही तीन वर्षांत 50 हून अधिक विमानांची योजना आखत आहोत, जी 5 वर्षात 100 च्या वर पोहोचेल. समूहाकडे दीर्घकालीन व्यवसाय योजनादेखील असल्याचे जालान यांनी म्हटले आहे.
जेट एअरवेजचे कार्यकारी सीईओ कॅप्टन सुधीर गौर म्हणाले, ‘जेटचे नवीन मुख्यालय दिल्ली-गुरुग्राममध्ये असेल. जेटने सुमारे 150 कर्मचाऱयांची भरती केली आहे आणि या आर्थिक वर्षाच्या अखेरीस आणखी 1000 कर्मचाऱयांची भरती केली जाईल. पहिले उड्डाण दिल्ली ते मुंबई सुरू होईल असे कंपनीने म्हटले आहे.
पुढील वर्षीपासून उड्डाणे
जानेवारी ते मार्च 2022 दरम्यान दिल्ली ते मुंबईदरम्यान पहिले उड्डाण सुरू होईल असे कंपनीने जाहीर केले आहे. कन्सोर्टियम यासाठी देशातील संबंधित अधिकाऱयांशी चर्चा करत आहे. या प्रक्रियेमध्ये विमानतळावरील स्लॉट वाटप, आवश्यक विमानतळ इन्फ्रा आणि नाईट पार्किंग इत्यादी बाबींचा समावेश आहे.






























































