
कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाला तोंड देत सोलापूर महापालिकेने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यांत केवळ 47 कोटींचा महसूल गोळा केला आहे. एप्रिल महिन्यात दोन कोटी 75 लाख, मे महिन्यात दोन कोटी 92 लाख, जूनमध्ये तीन कोटी 49 लाख, जुलै महिन्यात 16 कोटी 51 लाख आणि ऑगस्टमध्ये 21 कोटी 57 लाख रुपये महसूल सोलापूर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.
एप्रिल 2021 ते मार्च 2022 या आर्थिक वर्षासाठी दिलेले उद्दिष्ट 336 कोटी 79 लाख 85 हजार रुपये इतके आहे. त्यापैकी पाच महिन्यांत 47 कोटी 27 लाख 20 हजार 256 रुपये इतका महसूल प्राप्त झाला आहे. हे उत्पन्न उद्दिष्टाच्या 14.04 टक्के आहे. सोलापूर महापालिकेच्या एकूण 22 विभागांमार्फत मिळणारा हा महसूल आहे. यामध्ये सर्वांत मोठा वाटा करआकारणी, करसंकलन विभागाचा असतो. पाच महिन्यांत या विभागाकडून 33 कोटी 63 लाख 26 हजार रुपये इतकी करवसुली झाली आहे. वसुलीचे प्रमाण 12.07 टक्के आहे. या विभागाला चालू आर्थिक वर्षात 287 कोटी 66 लाखांचे उद्दिष्ट दिले आहे.
महसूल मिळवून देणारा दुसरा महत्त्वाचा विभाग म्हणजे नगररचना. या विभागाला 22 कोटी 77 लाखांचे उद्दिष्ट दिले असून, पाच महिन्यांत या विभागाने सात कोटी 46 लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत टाकले आहेत. मिळालेल्या उत्पन्नाचे प्रमाण 32.79 टक्के आहे.
सार्वजनिक बांधकाम, नगरअभियंता विभागाला सात कोटी 43 लाखांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी एक कोटी रुपये उत्पन्न मिळाले. टक्केवारीत हे उत्पन्न 13.57 इतके आहे. जाहिरात व व्यवसाय परवाना विभागाने 32.47 टक्के म्हणजेच 6.49 लाख रुपये उत्पन्न प्राप्त केले. मलनिस्सारण, तसेच जलनिस्सारण विभागाने 91 लाखांपैकी पाच महिन्यांत 29 लाख 27 हजार रुपये तिजोरीत जमा केले. अग्निशमन विभागाने 62 लाखांपैकी 17.50 लाख, मंडईने 2.53 कोटींपैकी 30.42 लाख, अतिक्रमण विभागाने एक लाखापैकी 22 हजार रुपये, अभिलेखापाल विभागाने 42 लाखांपैकी 12.89 लाख, क्रीडा विभागाने 23 लाखांपैकी फक्त 38 हजार रुपये उत्पन्न मिळविले.
विभागीय कार्यालय 1 ते 8 यांना एक कोटी 60 लाखांचे उद्दिष्ट दिले असून, पाच महिन्यांत त्यांनी 10 लाख रुपये इतका महसूल गोळा केला आहे. कोरोना निर्बंधांमुळे हुतात्मा स्मृतिमंदिर बरेच दिवस बंद होते. त्यामुळे या माध्यमातून मिळणारे उत्पन्नही घटले आहे. चालू वर्षी 25 लाखांचे उद्दिष्ट दिले असून, पाच महिन्यांत फक्त 15 हजारांचा महसूल प्राप्त झाला आहे.
काही विभागांकडून शून्य उत्पन्न
सोलापूर महापालिकेला काही विभागांकडून शून्य उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये प्राणिसंग्रहालय, निवडणूक विभाग, महापालिका शिक्षण विभाग, स्थानिक संस्था कर, उद्यान विभाग यांचा समावेश आहे. कोरोनामुळे प्राणिसंग्रहालय, उद्याने बंद आहेत. ‘एलबीटी’ची वसुली नाही. शाळा बंद आहेत. निवडणुका झालेल्या नाहीत. यामुळे या विभागांना पाच महिन्यांत भोपळाही फोडता आला नाही.
आरोग्य, घनकचरा विभागांकडून उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल
सोलापूर महापालिकेला दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल मिळवून देणारे दोन विभाग आहेत. त्यांपैकी आरोग्य विभागाने 135.27 टक्के, तर घनकचरा व्यवस्थापन विभागाने 151.32 टक्के महसूल प्राप्त केला आहे. आरोग्य विभागाला यंदा फक्त 57 लाख 75 हजारांचे उद्दिष्ट दिले हेते. या पाच महिन्यांत 78 लाख 12 हजारांचे उत्पन्न मिळविले. कोरोना निर्बंधांच्या काळात महापालिकेने दंडात्मक कारवाई करून मिळविलेली रक्कम या विभागाच्या उत्पन्नात धरण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाला 42 लाखांचे उद्दिष्ट दिले होते. प्रत्यक्षात या विभागाच्या नावे पाच महिन्यांतील उत्पन्न 63 लाख 55 हजार रुपये इतके नोंदविलेले आहे. शासनाकडून मिळालेल्या अनुदानाचा या विभागाला फायदा झाला आहे.
गाळ्यांच्या भाडेवाढीचा वाद पडला 15 कोटींना
भूमी व मालमत्ता विभागाकडून शहरातील व्यापारी गाळ्यांची भाडेवसुली होते. या विभागासाठी 16 कोटी 4 लाखांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी फक्त एक कोटी 23 लाख रुपये वसुली झाली आहे. गाळ्यांची भाडेवाढ वादात सापडल्याने हा फटका बसला आहे. वसुलीची टक्केवारी फक्त 7.69 टक्के इतकीच आहे.





























































