
चारित्र्यावरील संशयापोटी एका नवऱ्याने बायकोची वैयक्तिक माहिती चोरून तिचा गैरवापर केल्याची घटना कोथरूड येथे घडली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात 37 वर्षीय पतीच्या विरोधात आयटी ऍक्ट व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत 34 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. 2013 ते 2017 दरम्यान कोथरूड व बाणेर परिसरात हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे फिर्यादी यांच्यासोबत 2013 मध्ये विवाह झाला आहे. त्यानंतर आरोपीने बायकोकडे वारंवार पैशाची मागणी करून छळ सुरू केला. तसेच, चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण सुरू केली.
त्यानंतर पत्नीवर नजर ठेवण्यासाठी आरोपीने पत्नीला एक मोबाईल गिफ्ट दिल्याचा बहाणा केला. त्या मोबाईलमध्ये एक स्पाय म्हणजेच गुप्तहेरी करणारे ऍप घेतले. याद्वारे पत्नीबाबत सर्व माहिती ठेवली. पत्नीची वैयक्तिक माहिती परस्पर चोरून ती स्वतःच्या लॅपटॉपमध्ये घेतली.
सततच्या वादामुळे पत्नी सोडून गेल्यानंतर आरोपीने तिच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर केला. हा प्रकार समोर आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली. याप्रकरणी कोथरूड पोलिस अधिक तपास करत आहेत
























































