मोदींवर देश विकल्याचा आरोप होतोय, त्यांचं सरकार पडले का? संजय राऊत यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरोप करणे ही आता राजकीय फॅशन बनली आहे. एखाद्या सरकारवर आरोप झाले म्हणून ते सरकार पडत नाही. मोदी सरकारने तर देश विकल्याचाही आरोप होतोय, म्हणून त्यांचे सरकार पडले का? असा रोखठोक सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या आरोपांवर केला आहे.

सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बेछूट आरोप केले आहेत. त्यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवरही आरोप केले. खासदार संजय राऊत यांनी या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला. सोमय्यांचे जे काही सुरू आहे ते केंद्र सरकारच्या इशाऱयावर सुरू आहे. आरोप करून महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आरोप करणाऱयाच्या तोंडाला कुणी टाळे लावू शकत नाही. भाजपशासित राज्यांतील मंत्र्यांवर आणि नेत्यांवरही आरोप होतात. मोदी-शहा यांच्यावरही आरोप होतात. पण आरोपांमुळे सरकार पडत नाही. महाविकास आघाडी सरकार डरपोक नाही. आम्ही झुकणार नाही असेही खासदार राऊत यांनी ठणकावले. सोमय्या जे करीत आहेत त्याला नाटक म्हणू नका. महाराष्ट्रात या शब्दाला प्रतिष्ठा आहे. नाटक या शब्दाचा अपमान करू नका असा टोलाही राऊत यांनी लगावला.

मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही : गृहमंत्री

किरीट सोमय्या यांच्यावरील झालेल्या कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा काहीही संबंध नाही असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सोमय्या यांच्या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात जी स्थिती निर्माण झाली होती ती तेथील जिल्हा प्रशासनाने गृह विभागाला कळविले. संघर्ष टाळण्यासाठी कारवाईचे पाऊल उचलले असे वळसे यांनी सांगितले. स्थानिक वरिष्ठ अधिकाऱयांच्या माहितीवरून सोमय्या यांना नोटीस बजावण्यात आली आणि त्यात काहीच गैर नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.