ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा, वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने वीजग्राहक हैराण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेले काही दिवस खेड ग्रामीण भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होऊ लागला असल्याने वीजग्राहक हैराण झाले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवादरम्यानही तासंतास वीजपुरवठा खंडित राहिल्याने महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत होती. वीज बिलाच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. मग ग्राहकांना सुरळीतपणे वीजपुरवठा करण्याची जबाबदारी महावितरणची नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गेल्या काही वर्षात वीज दरामध्ये प्रचंड वदध झाली आहे. पूर्वी तीन महिन्यांचे जेवढे बिल येत असे तेवढे बिल आता दर महिन्याला येऊ लागले आहे याचा अर्थ विजेच्या दारात तीनपट वाढ करण्यात आली आहे. वाढलेले वीजबिल भरताना ग्राहकांचे कंबरडे मोडत आहे मात्र वीज पुरवठा करण्याला महावितरणला पर्याय नसल्याने केवळ नाईलाजास्तव येईल ते बिल भरावे लागत आहे. सर्वसामान्यांना न परवाढणाऱ्या दराने वीज बिलाची आकारणी करून ते बिल वसूल करण्यासाठी ग्राहकांना वीजपुरठा तोडण्याची धमकी देणाऱ्या महावितरणने किमान वीजपुरवठा सुरळीतपणे करावा अशी माफक अपेक्षा वीजग्राहकांची आहे. मात्र महावितरणच्या नियजनशून्य कारभारामुळे सणासुदीच्या काळातही वीजग्राहकांना अंधारात चाचपडावे लागत आहे.

गणेशोत्सवाच्या आधीपासूनच ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरु झाला आहे. कधी तांत्रिक बिघाड तर कधी देखभालीच्या नावाखाली दिवसभरातील अनेक तास वीजपुरवठा खंडित रहात आहे. रात्रीच्या वेळेतही वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामीण भागातील गावे अंधारात बुडून जात आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यास संबंधित विभागाच्या अभियंत्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास महावितरणचे अधिकारी फोन ही उचलत नाहीत त्यामुळे वीजपुरठा का खंडित झाला आहे. पुन्हा कधी सुरळीत होणार आहे याची माहिती ग्राहकांना मिळत नाही. वीज बिल वेळेत भरले नाही तर हेच अधिकारी ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देतात मग जेव्हा ग्राहक या अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याच्या प्रयत्न करतात तेव्हा या अधिकाऱ्यांना ग्राहकांशी सवांद साधण्यात कमीपणा का वाटावा याचा विचार होणे गरजेचे आहे.

ग्रामीण भागात वारंवार वीजपुवठा खंडित होत असल्याने ग्रामीण भागातील लघुउद्योजकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. ग्रामीण भागातील लघुउद्योजकांविजेवर चालणारे फेब्रिकेशन, पीठगिरणी अशा प्रकारचे व्यवसाय करून आपली उपजीविका करत असतात मात्र दिवस तासंतास वीजपुरवठा खंडित रहात असल्याने लघुउद्योजकांचे व्ययवसाय धोक्यात आले आहेत. महावितरण थकलेल्या वीजबिलासाठी ग्राहकांवर वीजपुरवठा तोडण्याची कारवाई करत असेल तर ग्राहकांना विनातक्रार वीजपुरवठा करण्याची जबाबदारी महावितरणची नाही का? या प्रश्नाचे उत्तर महावितरणने द्यायला हवे.