
एसटी बसमधून विनातिकिट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर एसटी करडी नजर ठेवणार आहे. 22 सप्टेंबरपासून एसटी तिकिट तपासण्यांची मोहिम सुरू केली आहे. सहा ऑक्टोबरपर्यंत ही मोहिम सुरू रहाणार आहे. ही मोहिम सुरू होण्या एक दिवस अगोदर एक खळबळजनक घटना घडली. परळ- खेड एसटीत चार बोगस तिकिटे सापडली आहेत. या घटनेवरून एसटीत बोगस तिकिट विक्री होत असल्याची घटना पुढे आल्याने तिकिट तपासण्यांच्या मोहिमेला महत्व आले आहे.
एसटी महामंडळाने एसटीमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात तिकीट तपासणी मोहीम सुरू केली आहे. मोहिमेदरम्यान विनातिकीट प्रवासी आढळल्यास संबंधितांकडून चुकविलेल्या भाडय़ाव्यतिरिक्त प्रवास भाडय़ाच्या दुप्पट रक्कम वसूल करण्यात येणार आहे.प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्याकरिता व विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी 22 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर 2021 (15 दिवस) या कालावधीदरम्यान एसटी महामंडळ तिकीट तपासणी मोहीम राबविणार आहे. या मोहिमेत विभागातील मार्ग तपासणी पथकातील व आगारातील सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी यांचाही समावेश केला जाणार आहे. यावेळी विनातिकीट प्रवास करताना प्रवासी आढळल्यास त्यांच्याकडून चुकविलेल्या भाडय़ा व्यतिरिक्त प्रवास भाडय़ाच्या दुप्पट रक्कम किंवा रुपये 100 यापैकी जी रक्कम अधिक असेल ती दंड म्हणून कसूल करण्यात येईल. त्यामुळे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.मोहिमेच्या पहिल्याच दिवशी लांजा आणि दापोली तिकीट हरवलेले प्रत्येकी दोन प्रवासी आढळले होते.त्या प्रवाशांकडून दंड आकारला तसेच त्यांना पुन्हा तिकीट काढावे लागले.
कोऱ्या रोलवर बोगस तिकिट
परळ-खेड गाडीत चार बोगस तिकिटे सापडल्यानंतर त्या गाडीतील वाहकाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला असल्याची माहिती एसटीचे अधिकारी अनंत जाधव यांनी दिली.अशिक्षित किंवा परप्रांतीय प्रवाशांना कोऱ्या रोलवर लिहून तिकिटे दिली जात असल्याचे प्रकार घडत आहेत.



























































