
गोवा, दमण येथून राज्यात होणाऱ्या दारू तस्करीचा माग काढण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने श्वान पथकाची मदत घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे. कमी अबकारी करामुळे महाराष्ट्राच्या तुलनेत गोवा आणि दमणमध्ये दारू स्वस्त आहे. या राज्यात असलेल्या स्वस्त दारुमुळे या दोन ठिकाणांहून राज्यात दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे , असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याला आळा घालण्यासाठी आता श्वान पथकाची मदत घेण्यात येणार आहे.
राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने गोवा आणि दमणमधून महाराष्ट्रात होणाऱ्या दारु तस्करीचा माग काढण्यासाठी 40 श्वानांचे पथक तयार करण्याची योजना आखली आहे. उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
दारु तस्करीचा माग काढण्यासाठी आम्ही श्वान पथकांचा समावेश करण्याची योजना आखली आहे. आम्ही हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवणार आहोत. हे प्रशिक्षित श्वान गोवा आणि दमणच्या राज्याच्या सीमा तपासणी चौक्यांवर तैनात केले जातील. या ठिकाणांहून राज्यात होणाऱ्या दारू तस्करीचा श्वान माग काढतील. या ठिकाणांहून दारू तस्करीमुळे राज्याचे होणारे महसुली नुकसान टाळता येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
उत्पादन शुल्क विभागातील श्वान पथकात बेल्जियन शेफर्ड जातीच्या श्वानांचा समावेश करण्यात येणार आहे. या श्वानांना दारुचा माग काढण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कमी अबकारी करामुळे महाराष्ट्राच्या तुलनेत गोवा आणि दमणमध्ये दारूचे दर कमी आहेत. या ठिकाणी दारु स्वस्त असल्याने या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात राज्यात दारूची तस्करी होत आहे. या तस्करीत वाढ झाल्याने राज्याचे मोठ्या प्रमाणात महसुली नुकसान होत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या दोन ठिकाणांहून राज्यात येणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. तस्करीसाठी तस्कर अद्ययावत पद्धत वापरत असल्याने तसेच प्रत्येक वाहनाची तपासणी करणे शक्य होत नसल्याने तस्करीत वाढ होत आहे. तसेच इतर वस्तूंच्या मागे दारू लपवून तस्करी होत आहे. श्वान पथकांची मदत घेतल्यास अशा प्रकारे होणाऱ्या तस्करीला आळा घालता येणार आहे. ते सहजतेने अशा प्रकारे होणारी तस्करी शोधण्यात तरबेज असल्याने राज्याचे महसूली नुकसान टाळता येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गोव्याहून सिंधुदुर्गात येण्यासाठी आठ ते दहा मार्ग आहेत. या सर्व मार्गांवर देखरेख करत वाहनांची तपासणी करणे शक्य नाही. त्याचप्रमाणे दमणहून राज्यात येण्यासाठी सहा मार्ग आहेत. त्यावरही देखरेख करणे कठीण आहे. त्यामुळे सीमेवरील प्रत्येक चौक्यांवर श्वान पथक तैनात केल्यास त्याचा फायदा होणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त यतीन सावंत यांनी सांगितेल की, दारु तस्करीमुळे नेमके किती महसुली नुकसान होत आहे, हे सांगणे कठीण आहे. मात्र, दारु तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. श्वान पथक तैनात करताना त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिले जाणार आहे. श्वान पथकासाठी सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत केनेल बांधण्यात येणार आहेत. बिहार आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये दारू तस्करी रोखण्यासाठी श्वान पथके तैनात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
राज्याच्या सर्व सीमांवर 24 तपासणी चौक्या आहेत. सध्या उत्पादन शुल्क कर्मचारी फक्त 11 चौक्यांवर तैनात आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, लवकरच उत्पादन शुल्कचे कर्मचारी उर्वरित तपासणी चौक्यांवर तैनात केले जातील. त्याचबरोबर श्वान पथक तैनात करण्याचाही प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले.



























































