महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणाच्या तपासाची सूत्रे सीबीआयच्या हाती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणाच्या तपासाची सूत्रे केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) हाती घेतले आहेत. सीबीआयकडून या प्रकरणात एक एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाच्या तपासासाठी सहायक आयुक्त के. एस. नेगी यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय पथकाचे गठन करण्यात आले आहे.

सीबीआयच्या दिल्ली क्राइम ब्रँचची ही टीम सीबीआय मुख्यालयातून निघाली असून ती लवकरच प्रयागराजमध्ये दाखल होणार आहे. प्रयागराजच्या जॉर्जटाऊन पोलीस ठाण्यातील आरोपपत्राच्या आधारे सीबीआयने आपल्या एफआयआरमध्ये महंतांचा शिष्य आनंद गिरी याला प्रमुख आरोपी बनवले आहे.

गेल्या सोमवारी धार्मिक नेते महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण दिसत असले तरी हा मृत्यू संशयास्पद असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यावर उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारकडून या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची शिफारस करण्यात आली होती.

सीबीआय पथक महंतांच्या वाघम्बरी मठातील त्यांची खोली उघडून पाहणार आहे. त्यांचा मृतदेह मिळालेली खोली सध्या सील करण्यात आली आहे. महंत गिरी यांच्या सुसाइड नोटसह त्यांचे पार्थिव सापडलेल्या कक्षाचे सीबीआय फॉरेन्सिक पथक बारकाईने पाहणी करणार आहे. अटकेत असलेले आनंद गिरी, आद्या प्रसाद आणि संदीप तिवारी या महंतांच्या शिष्यांचीही चौकशी सीबीआय पथक करणार आहे.