
गुलाब वादळामुळे पूर्व किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू असून सर्वात मोठा तडाखा मराठवाड्याला बसला आहे. या वादळामुळे सोमवारी रात्री उशिरापर्यंत 80 ते 100 किमी वेगाने वारे वाहत होते. याचा फटका संभाजीनगर, बीड, नांदेड, जालना, हिंगोली, धाराशीवसह संपूर्ण मराठवाड्याला बसला. मराठवाड्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मांजरा धरणाचे दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. मांजरा नदीच्या काठावर अनेक लोक अडकले आहेत. प्रशासनाच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बीड जिल्ह्यातील सर्व नद्या धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत. दरम्यान पावसाने विश्रांती घेतल्याने थोडा दिलासा मिळाला असला तरी पावसाच्या संकटाचे ढग अजूनही हटलेले नाहीत. बीड जिल्ह्यातील उंद्री तलावाचा सांडवा फुटला असून आजूबाजूची शेती पूर्ण वाहून गेली.
संभाजीनगरमध्येही दाणादाण उडाली आहे. शहरातील सखल वस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे.
केज तालुक्यात ढगफुटीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. मांजरा धरणात पाण्याचे अजस्त्र लोंढे आले. अशा परिस्थितीत रात्रभर अधिकारी ठाण मांडून होते. या धरणाचे आधी सहा दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर सर्व दरवाजे उघडण्यात आले.
जालनामध्ये सात मोठी धरणं ओव्हर फ्लो झाली आहेत. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाल्याने वाहतूक थांबलेली आहे.
नांदेडमध्ये गोदावरी नदीवरील विष्णुपूरीचे 11 दरवाजे उघडले आहेत.
किनवट, मुदखेड मध्येही पावसाने भयंकर दाणादाण उडवली आहे. कळंबमध्ये 20 जण पुराच्या पाण्यात अडकल्याचे वृ्त्त आहे.
लातूरमधील रेनापूर येथे एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे.
माझलगाव धरणातून देखील विसर्ग करण्यात येत आहे.
दरम्यान, मराठवाड्यात प्रशासन कामाला लागले आहे. पावसामुळे कापूस सोयाबीनची पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. सुदैवानं जीवितहानीचे वृत्त नाही.





























































