
राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने धरणे तुडुंब भरली आहेत. सध्या राज्यातील धरणे 81 टक्क्यांहून अधिक भरली आहेत. परिणामी संपूर्ण राज्यात सध्या केवळ सहा टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गात तर एकही टँकर धावत नसल्याची चांगली बातमी जलसंपदा विभागातून आली आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातील धरणांमध्ये 81.98 टक्के पाणीसाठा सध्याच्या घडीला आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. राज्याच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. अनेक जिह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. पण दुसरीकडे पाण्याची चिंता मिटली आहे. राज्यातल्य वाडय़ा-वस्त्यांमघील ग्रामस्थांवर टँकरची वाट बघण्याची वेळ येत नाही. सध्या फक्त पुण्यात तीन, धुळे, नगर, बुलढाण्यात प्रत्येकी एक असे सहाच टँकर सध्या धावत आहेत. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यांमध्ये तर एकही वाडी-वस्ती टँकरच्या पाण्यावर सध्याच्या घडीला अवलंबून नाही असे जलसंपदा विभागातील सूत्रांनी सांगितले.
पाणीबाणीचे संकट
राज्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यावर टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. काही वर्षांपूर्वी तर राज्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. नोव्हेंबर 2019 मध्ये तर राज्यात अतिशय दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा 5 हजारांहून अधिक टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. तेव्हा तर राज्यातल्या धरणांमध्ये केवळ 20 टक्के पाणीसाठा होता.
टंचाई कृती आराखडा
या वर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. तरीही भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यास सुरवात केली आहे. ज्या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा 50 टक्के पाऊस पडला आहे आणि पाण्याची पातळी सरासरी पातळीपेक्षा दोन मीटरने खाली गेली आहे अशा तालुक्यांची यादी तयार करण्याच्या सूचना या विभागाने दिल्या आहेत. त्याशिवाय पाण्याच्या वापराचे नियोजन आणि जलाशलाय पाणीसाठा राखून ठेवण्याबरोबरच अनिर्बंध उपसा व अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या आहेत.






























































