
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या 92व्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. गायनकलेच्या देव्हाऱयातील साक्षात सरस्वतीचा आज वाढदिवस आहे. लतादीदींचे समग्र जीवन म्हणजे दैवी आणि निसर्गदत्त स्वरांची एक सदाबहार सुरेल कहाणीच. घराघरांत आणि मनमनांत घुमणारी ही स्वरलकेर शतायू…दीर्घायू… चिरायू होवो, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा संदेशातून दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, जगाच्या कानाकोपऱयात विसावलेल्या प्रत्येक हिंदुस्थानी माणसावर स्वरांचं अनभिषिक्त अधिराज्य गाजवणारा हा स्वर महाराष्ट्रातच आहे, हे आमचं महाभाग्यच! आपला आणि ठाकरे परिवाराचा स्नेह तर मी लहानपणापासून पाहत आलोय. आपल्या कोकीळकंठी आवाजाचा गोडवा दशकानुदशके देशवासीयांच्या काना-मनांत रुंजी घालत आलाय. पिढय़ानपिढय़ा या स्वरामृतात चिंब न्हाऊन निघाल्या आहेत. आपल्या दिव्य सुरांनी गांधाराचे गांभीर्य आणि पंचमाचे पावित्र्य जपणारा कोमल स्वरसंस्कार आमच्यावर केला. अशा अवीट गोडीच्या चिरंजीव स्वरांचा आज वाढदिवस. स्वर मोगऱयाच्या गुच्छाचा हा दरवळ असाच धुंदगंधित करत राहो. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या लाडक्या दीदींना उदंड दीर्घायुरारोग्य लाभो…एवढंच मागणं त्या जगन्नियंत्याच्या चरणाशी.































































