
गिरगावमधील एलआयसीच्या मालकीच्या 125 वर्षे जुन्या इमारतींचा लवकरच पुनर्विकास होणार आहे. या इमारतींचा पुनर्विकास मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या माध्यमातून करण्यासंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करा असे म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी एलआयसीला सांगितले.
एलआयसीचे अधिकारी, शिवसेना खासदार अरविंद सावंत, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर आणि संबंधित इमारतींमधील रहिवाशांची संयुक्त बैठक आज एलआयसीचे अध्यक्ष एम. आर. कुमार यांच्या दालनात झाली. दक्षिण मुंबईत एलआयसीच्या मालकीच्या 82 उपकरप्राप्त इमारती आहेत. त्यात आंग्रेवाडी चाळ, नवीन बदामवाडी, देवकरण नाणजी या इमारती सव्वाशे वर्षे जुन्या आहेत. या इमारतींमध्ये निवासी व अनिवासी अशा एकूण 2052 सदनिका आहेत. या इमारतींची म्हाडाकडून अनेकदा दुरूस्ती करण्यात आली. मात्र त्या जुन्या असल्यो त्यांचा पुनर्विकास म्हाडाच्या वतीने केला जाऊ शकतो अशी भूमिका या बैठकीत खासदार सावंत आणि घोसाळकर यांनी मांडली. त्याबाबत लवकरात लवकर म्हाडाला प्रस्ताव सादर केला जाईल असे एलआयसीचे अध्यक्ष कुमार यांनी सांगितले.


























































