
रोगप्रतिकारक्षमता वाढण्यासाठी सूप पिणे आवश्यक आहे. कारण निरोगी राहण्याकरिता आवश्यक असलेली प्रथिने, जीवनसत्त्वे, अँण्टी ऑक्सीडंट अशा विविध गुणधर्मांनी सूप परिपूर्ण असतात. यामुळे उत्तम आरोग्याकरिता रोजच्या आहारात सूपचा समावेश करणे फायदेशीर ठरते, असे असले तरीही काही सूपचे प्रकार असेही आहेत की, ज्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते. पाहूया, लठ्ठपणा कमी करण्याचे सुप्सचे विविध प्रकार.
बीट
बीट खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रमाणात आयर्न मिळते. सलाड, भाजी, कोशिंबीर अशा विविध स्वरुपात बिटाचा आहारात समावेश करता येऊ शकतो. वाढणारे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी बिटाच्या सूपचा आहारात समावेश करू शकता. बिटाच्या सुपात दुधी, बटाटा, कांदा आणि टोमॅटो घालून चवदार सूप तयार होते.
गाजर
हलवा आणि सलाडमध्ये गाजर वापरले जाते. यामध्ये जीवनसत्त्व सी असते. त्यामुळे रोगप्रतिकारक्षमता उत्तम राहण्याकरिता गाजर खाणे आवश्यक आहे. गाजराचे सूप तयार करताना त्यामध्ये आले आणि आपल्या आवडीच्या भाज्या घाला. यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण येण्यास मदत होते.
फ्लॉवर
फ्लॉवरचे सूप वजन घटवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी प्रमाण असते. फ्लॉवरचे सूप तयार करताना काजूची पेस्ट, लसूण, कांदा आणि कोबीचा वापर करू शकता.
पालक
पालकच्या सुपमध्ये पौष्टिक घटकांचा समावेश जास्त प्रमाणात असतो. पालकच्या सुपामध्ये हिरवी मिरची, आले, बडीशेप आणि हळद हे मसाल्याचे पदार्थ वापरा. जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी आपल्या आहारात अशा पद्धतीने तयार केलेल्या पालक सूप घ्यावे.
व्हेज सूप
हे सूप फक्त वजन कमी करण्यासाठी नसून यामुळे शरीराची रोगप्रतिकारक्षमता वाढायलाही मदत होते. व्हेज सुपमध्ये जास्त प्रमाणात पौष्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे शरीराला उर्जा मिळते. या प्रकारचे सूप प्यायल्याने आजारांपासून संरक्षण होते. भाज्यांमध्ये फायबर, मिनरल आणि जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. व्हेज सूप प्यायल्याने पचनक्रिया उत्तम राहते. त्यामुळे वाढलेले वजनाबाबत चिंताग्रस्त होण्याऐवजी आहारात व्हेज सूप घ्यावे.



























































