नगर जिल्ह्यात सरासरीच्या दीडपट पाऊस, खरिपाच्या पिकांसह फळबागांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदाच्या पावसाने जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 463.5 मिलिमीटर पाऊस पडतो, तो यंदा आतापर्यंत 637.3 मिलिमीटर म्हणजे 137.5 टक्के झाला आहे. येत्या दोन दिवसांत पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त झाला असल्याने यंदा जवळपास दीडपट पाऊस होण्याची शक्यता आहे. खरिपातील बाजरीचे पीक बऱयापैकी निघाले असले तरी आता कपाशी, सोयाबीन व फळबागा गुडघाभर पाण्यात आहेत. पाण्यामुळे ही पिके काळी पडू लागल्याने शेतकऱयांचे अतोनात नुकसान होत आहे.

नगर जिल्ह्यात मुळा, भंडारदरा व निळवंडे या तीन मोठय़ा धरणांसह एकूण 16 प्रकल्प आहेत. उत्तरेत या तीन मोठय़ा धरणांसह आढळा, भोजापूर ही आणखी दोन धरणे आहेत, तर दक्षिण नगर जिल्ह्यात पिंपळगाव जोगा, येडगाव, वडज, माणिक डोह, डिंभे, घोड, मांडओहोळ, घाटशीळ पारगाव, सीना, खैरी व विसापूर ही 11 धरणे आहेत. ही सर्व 16 धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. जिल्ह्यातून वाहणाऱया गोदावरी, मुळा, प्रवरा, सीना या प्रमुख नद्यांसह अन्य छोटय़ा-मोठय़ा नद्याही दुथडी भरून वाहताना दिसत आहेत. मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांतून पाण्याचा मोठा विसर्ग नदीपात्रात सोडला जात असल्याने पैठणचे जायकवाडी धरणही भरले आहे. पाणीच पाणी चोहीकडे अशी स्थिती जिल्हाभरात झाली आहे. मात्र, यामुळे खरीप पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

जूनपासून सलग चार महिने जिल्ह्यात पाऊस अपेक्षित असतो. यंदा ऑक्टोबर उजाडला असतानाही ऑक्टोबर हिटचा कोठे मागमूसही दिसत नाही. दिवसातील निम्म्यापेक्षा जास्त काळ आभाळ भरून आलेले असते व सायंकाळी पाऊस कोसळत आहे. मागच्या महिन्यात शेवगाव व पाथर्डीला तर पूरस्थिती उद्भवली होती. राहुरीसह अन्य काही तालुक्यांतूनही ढगफुटीसदृश पावसाने पिकांचे नुकसान केले आहे.

दुष्काळी पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक पाऊस

यंदा तालुकानिहाय सर्वाधिक पडलेल्या पावसाच्या यादीत अनपेक्षितपणे पाथर्डी तालुक्याने अग्रस्थान मिळवले आहे. दरवर्षी अकोले तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो. पण, यंदा पाथर्डी क्रमांक एकवर असून, त्यापाठोपाठ शेवगाव व मग तिसऱया क्रमाकांवर अकोले आहे. त्यानंतर नेवासे, श्रीरामपूर, राहुरी, कोपरगाव, श्रीगोंदे, संगमनेर, नगर तालुका, पारनेर, कर्जत, जामखेड व राहाता तालुक्यांचे क्रमांक आहेत.

फक्त सात मंडळांत कमी पाऊस

जिल्ह्यातील पावसाच्या आकडेवारीचे संकलन मंडलनिहाय होते. जिल्ह्यात अशी 87 मंडले असून, यापैकी केवळ 7 मंडलांमध्ये यंदा सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. तर, बाकी 80 मंडलांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून, यापैकी 5 मंडलांमध्ये तर दुप्पट म्हणजे 200 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. नगर तालुक्यातील केडगाव (93 टक्के) व रुईछत्तीशी (97 टक्के), पारनेर तालुक्यातील निघोज (87 टक्के), श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी (94 टक्के), कर्जत तालुक्यातील कर्जत (72 टक्के) व भांबोरा (88 टक्के) आणि संगमनेर तालुक्यातील आश्वी (84 टक्के) या सात मंडळांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे, तर शेवगाव तालुक्यातील बोधेगाव व चापडगाव, पाथर्डी तालुक्यातील टाकळी व कोरडगाव आणि अकोले तालुक्यातील साकीरवाडी अशा पाच मंडलांमध्ये दोनशे टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

यंदा तालुकानिहाय पडलेला पाऊस (मिलिमीटर)

तालुका      सरासरी      यंदाचा पाऊस     टक्केवारी
पाथर्डी        489           926             189
शेवगाव       477           896             170
अकोले       503            849            168
जामखेड      591           694             117
श्रीरामपूर     482           680             141
नेवासे        422            659             149
राहुरी        449            615             136
नगर         496            598             120
कोपरगाव   417            579             139
श्रीगोंदा      421            562             133
कर्जत       464            556             119