नगर शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत. खड्डय़ांवरून मनपा प्रशासनावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. यासंदर्भात मनपाच्या बांधकाम विभागाने खुलासा केला असून, पाऊस, विविध कामांमुळे होणारी रस्ते खोदाई, तुटपुंजा निधी, तांत्रिक कमी मनुष्यबळ आदी बाबींवर खापर फोडण्यात आले आहे.

पाणीपुरवठय़ाची फेज-2, अमृत योजना, भूमिगत केबल टाकणे, मोबाईल कंपन्या, पाणीपुरवठा विभागाच्या वाहिन्या, ड्रेनेज, गटारे, नळ कनेक्शन, मलनिःसारण जोडण्या व इतर देखभाल-दुरुस्तीसाठी रस्ते वारंवार खोदले जात आहेत. रस्त्याचा थोडा भाग खोदला, तरी या खोदकामामुळे रस्त्याची एकसंधता विस्कळीत होऊन खोदलेल्या रस्त्याच्या आजुबाजूचा परिसर निकामी होत आहे. शहराचे क्षेत्रफळ, लोकसंख्या, रस्त्यांची लांबी याचा विचार करता व मनपाची एकूण आर्थिक परिस्थिती, उत्पन्नाचे मर्यादित स्रोत व अत्यावश्यक, बांधील खर्च याचा विचार करता विकासकामांसाठी अतिशय तुटपुंजा निधी राहातो. मागणी व पुरवठय़ामध्ये मोठी तफावत आहे.

मनपाकडे तांत्रिक मनुष्यबळ व अभियंते कमी आहेत. संपूर्ण बांधकाम विभागाचे कामकाज फक्त दोन अभियंते व एक शहर अभियंता यांच्यावर अवलंबून आहे. याचाही कामकाजावर परिणाम होत आहे. या परिस्थितीत मनपा प्रशासन, नगरसेवक, पदाधिकारी, महापौर, आमदार हे सातत्याने प्रयत्न करून विविध शासकीय योजनांमधून निधी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक कामांसाठी निधी मिळालेला असून, विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत व सुरू आहेत, परंतु शहराचा विस्तार विचारात घेता सुरू असलेल्या कामांची संख्या कमी आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक रस्त्यांची कामे मंजूर असून, त्यांचे कार्यारंभ आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत, परंतु मध्यवर्ती भागात अमृत भुयारी गटार योजनेचे काम सुरू असून, या योजनेंतर्गत शहरात रस्ते खोदकाम करून पाइप अंथरले जाणार आहेत. त्यामुळे बहुतांश रस्त्याचे खोदकाम होणार आहे ही वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. हे काम करताना जमिनीखाली असलेल्या यंत्रणा विस्कळीत होणार आहेत. त्याचा पर्यायाने नागरिकांना त्रास होणार आहे, परंतु भविष्यातील 50 वर्षांचा विचार करता ही योजना पूर्ण होणे आवश्यक आहे. मनपा प्रशासन सदर योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे मनपाच्या बांधकाम विभागाने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

राहाता 464 535 115

पारनेर 428 515 120

संगमनेर 362 473 130

एकूण 463 637 137