
>> अरुणा सरनाईक
जेव्हा जेव्हा पृथ्वीवर संकटे आली तेव्हा तेव्हा आदिशक्तीला आवाहन केलं गेलं. देवांनी आणि मानवांनी; मग ते महिषासुररूपी संकट असो अथवा नैसर्गिक आपत्ती असो तिच्या अनुपम रूपांचे गोडवे नेहमीच गायिले गेले. कधी ती सौम्य रूपात, कधी उग्र रूपात, पण नेहमीच आपल्या भक्तासांठी ती धावून आलेली आहे. या आदिशक्तीचे पुरुष भक्त महिलांहून अधिक आढळतात. मात्र नवरात्रीचे नऊ दिवस उपास करून अखंड पूजन करणारे हे पुरुष भक्त इतर वेळी इतर दिवशी स्त्रियांशी वेगळे का वागतात? इथं त्यांची सौहार्द्रता का दिसून येत नाही.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमंते तत्र देवताः असं म्हणतात. ज्या ठिकाणी स्त्रीची पूजा केली जाते, ज्या ठिकाणी स्त्री ही वंदनीय आहे, जिथे तिच्या मताला किंमत आहे, तिच्या स्वाभिमानाचे रक्षण केले जाते त्या ठिकाणी देवांचे वसतिस्थान असते. त्या ठिकाणी देव रमतात, असा या ओळीचा अर्थ होतो. हे आठवायचे कारण पुन्हा नवरात्रीचे दिवस येतात. दरवर्षी येणाऱ्या आदिशक्तीचे आगमन मनाला पुन्हा विचार करायला भाग पाडते. या आदिशक्तीचीच रूपं असणारी आजची स्त्री कशा प्रकारचं जिणं जगतेय! आजच्या कलियुगात तिचा योग्य तो मान राखला जातो का? वर वर पाहता समसमानतेच्या युगात जरी समान हक्क दिला गेलेला आहे तरी मनापासून तो ग्राह्य आहे का? अगदी ऐरणीच्या टोकावरचा प्रश्न जरी नसला तरी पुन्हा नव्यानं विचार करणं गरजेचं ठरू पाहतंय हे नक्की.
देवानं जग निर्माण केलं. पुरुष निर्माण केला. तरीही जगाला पूर्णता आली नाही. काही त्रुटी देवाला जाणवल्या. मग त्यानं पुरुषाच्या अर्ध्या अंगापासून स्त्री निर्माण केली. अशी रूपककथा आहे. म्हणूनच तिला अर्धांगी म्हटलं जातं. पण हे अर्धांग पूर्ण आहे. या पूर्णत्वाची जाणीव वेळोवेळी जगाला झालेली आहे. अनुभवाला आलेली आहे. असं असताना मग ही आज होणारी वंचना तिच्या वाटेला का यावी? आणि हा अनुभव दर काळात, दर युगात तिच्या वाटेला आलेला आहे. कधी सीता कधी द्रौपदी तर कधी अहिल्या. म्हणून स्त्री ही आदिशक्ती मानली जाते तर मग असे का? याची उत्तरे काळात दडलेली आहेत की पुरुषप्रधान संस्कृतीच्या अंतर्मनात?
आश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या नवरात्राची सुरुवात होते. याला शारदीय नवरात्रदेखील म्हणतात. नवरात्रीचें दिवस मोठे छान असतात. नऊ दिवसांत आदिशक्तीचे 9 रूपात पूजन होते. पहिले 3 दिवस महाकालीपूजन. नंतरचे 3 दिवस महालक्ष्मीपूजन आणि शेवटचे 3 दिवस महासरस्वतीपूजन. पूर्णता चैतन्यमय दिवस, आल्हादकारक वातावरण आणि निसर्गाचं विलोभनीय सक्रिय समर्पण. सकाळच्या कोवळय़ा वेळी सूर्याच्या सोनेरी किरणात उगवलेली पहाट ‘हरी ओम् हिरण्यवर्णाम्…’ अशा मंगलमय पवित्र स्वरांनी अधिकच पवित्र होते. मागच्या बंगाली घरातून धुपाचा वास, शंखध्वनी वातावरणात भिनू लागतो. आणि खऱ्या अर्थानं नवरात्र सुरू होत असल्याची जाणीव होते… ऑफिसला जाताना रस्त्यावरदेखील नवरात्र विविध रंगांच्या सुंदर रेशमी साडय़ांमधून जाणवत राहातं. माणसाचं मन असंच असतं, जे आज आहे, जे ताजं ते आपलंस करायचं आणि येणाऱ्या दिवसाचं स्वागत करायचं ही वृत्ती स्त्रीमध्ये तर जास्तच प्रकर्षानं जाणवते. दुःख सोसण्याची जबरदस्त ताकद तिच्यात आहे. पुरुषानं कितीही नाकारलं कितीही, त्रास दिला तरी तिच्यात पुनश्च ताकदीनं उभी राहण्याची शक्ती आहे. साधंसं उदाहरण, काही दिवसापूर्वी माझ्या कामवालीनं सांगितलं, ‘बाई, घरवाला काही काम करत नाही. नुस्ता पितो आणि घरात दंगा करतो. दोन मुलं. त्यातील मुलगी वयात आलेली. कसं सांभाळू? खूप सोसलं. पण आता नाही. घराचं दारच आता त्याला बंद.’ नेहमीचीच कथा आणि आज? तिचं नवरात्रात 9 दिवस उपास करणार. नवऱ्यासोबत जाऊन देवीची ओटी भरणार का गं? असं मी विचारताच ती म्हणते, ‘जाऊद्या बाई, आपला जन्म असाच, नवऱ्याला माफ करायचं, झालं गेलं विसरायचं आणि पुढं चलायचं. तेच तेच धरून का कुठं चालतंय.’ चार वर्गसुध्दा शिकली असेल असं वाटत नाही, पण ही विचार करण्याची तिची ताकद तिच्यात उपजत आहे. सोशिकता हा गुण निसर्गानं तिला जन्मतः दिलेला आहे.
जेव्हा जेव्हा पृथ्वीवर संकटे आली तेव्हा तेव्हा आदिशक्तीला आवाहन केलं गेलं. देवानी आणि मानवांनी. मग ते महिषासुररूपी संकट असो अथवा नैसर्गिक आपत्ती असो. तिच्या अनुपम रूपाचे गोडवे नेहमीच गायिले गेलेले आहे. कधी ती सौम्य रूपात, कधी उग्र रूपात, पण नेहमीच आपल्या भक्तासांठी ती धावून आलेली आहे. तिचे स्त्री भक्तांपेक्षा पुरुष भक्त अधिक भाविक आढळतात. नवरात्रीचे नऊ दिवस उपास करून अखंड पूजन करताना इतर वेळी इतर दिवशी स्त्रियांशी वेगळे का वागतात, त्यांची सौहार्द्रता का दिसून येत नाही. लहानपणीची एक आठवण दर नवरात्रात मला होते. समोर राहणारे काका नवरात्रात नऊ दिवस उपास करत. रात्री आरतीच्या वेळी काकूंच्या अंगात देवीचा संचार होई. आरतीला खूप लोक जमत असत. त्यावेळी काका काकुला अगदी वाकून नमस्कार करत, अगदी भक्तीभावानं! आरती संपल्यावर मात्र जेवण वाढायला उशीर झाला की ऐवढे मोठय़ानं ओरडत… सगळय़ा आळीला ऐकू जायचे. शेजारची मथी आजी म्हणायची, काय मेला हा माणूस. आधी मारे फुलांनी पूजा करतो आणि मग… मी एकदा असं म्हटलं होतं की, मग काकूंनी नेहमीच देवी म्हणून राहावं.
वास्तविक पुरुषप्रकृति, एकाच रथाची दोनं चाकं, वाचून देऊन गुळगुळीत झालेल्या उपमा. सवयीनं त्याच त्या ओठावर येतात. पुरुष श्रेष्ठ की स्त्री! कशासाठी वाद घालायचा. केवळ रोजच्या जीवनात नाही तर पूजेच्या अगदी नवरात्रीत देवीच्या पूजेच्या वेळी दोघांची सारखी गरज असते. तेव्हा हा वाद आता नको. मनात आदिशक्तीचं स्मरण करावं. जमल्यास पुढच्या संपूर्ण जीवनात स्त्रीला आदरानं, किमानपक्षी माणूस म्हणून वागवावं असा पण करावा. आदेश नाही आग्रह आहे.
































































