सत्ता गेल्याची वेदना किती सखोल हे दिसून येतेय!शरद पवारांचा फडणवीसांना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटतेय’ या फडणवीसांच्या विधानाचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही समाचार घेतला. पाच वर्षे सत्तेत असल्याचं स्मरण राहणं हे कधीही चांगलं. वेदना किती खोल आहे हे यातून दिसते, असा टोला लगावतानाच शरद पवार यांनी, सत्ता येते-जाते याचा फारसा विचार करायचा नसतो, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिला.

शरद पवार म्हणाले, ‘पाच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत आहोत याचं स्मरण ठेवणं ही चांगली गोष्ट आहे. मी चार वर्षे मुख्यमंत्री होतो, पण माझ्या लक्षात कधी राहिलंही नाही. ही आमची कमतरता आहे हे मी कबूल करतो. सत्ता गेल्याची वेदना किती सखोल आहे हे यातून दिसून येतं.’

माजी मुख्यमंत्र्यांनी लखीमपूर आणि मावळची तुलना करू नये

माजी मुख्यमंत्र्यांनी मावळमध्ये काय घडलं हे सांगितलं ते बरं केलं. तेव्हा शेतकरी मृत्युमुखी पडले, त्याला जबाबादार कुणी सरकारी नेते नव्हते. तो आरोप पोलिसांवर होता. त्याला बराच काळ होऊन गेला आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्र्यांनी लखीमपूर आणि मावळ याची तुलना केली. आता मावळचं चित्र पूर्वीपेक्षा स्पष्ट झालं आहे. मावळमध्ये परिस्थिती हाताबाहेर जावी यासाठी स्थानिक भाजपच्या लोकांनी प्रोत्साहित केलं. आता हे लोकांच्या लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके 90 हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. म्हणून माजी मुख्यमंत्र्यांनी मावळचं उदाहरण काढलं ते बरं झालं. जर त्यांनी मावळमधली परिस्थिती समजून घेतली तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा टोला त्यांनी लगावला.

मी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलो – देवेंद्र फडणवीस

यावर फडणवीस म्हणाले, चाळीस वर्षांत मी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलो. पवार साहेब मोठे नेते आहेत, पण ते कधीच सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले नाहीत. राहिले असते तर बरं झालं असतं. त्यांनी चांगलंच काम केलं असतं. पण त्यावेळच्या परिस्थितीमुळे त्यांना कधी अडीच वर्षे, कधी दीड वर्ष असं मुख्यमंत्रीपदावर राहावं लागलं. पण एका गोष्टीचं मला समाधान आहे की, मी विरोधी पक्षनेता म्हणूनही समाधानी आहे.