
रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आधी काँग्रेसमध्ये सामील व्हावे मग पक्षाला सल्ला द्यावा अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते हरिश रावत यांनी केली आहे. प्रशांत किशोर यांनी पक्षात कार्यकर्ता म्हणून आधी सामील व्हावे त्यांचे स्वागत आहे असेही रावत म्हणाले.
इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकाला मुलाखत देताना रावत म्हणाले की, प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षात आधी सामील व्हावे. कार्यकर्ता म्हणून काम करावे मग पक्षाला सल्ला द्यावा. त्यानंतरही त्यांच्या सल्ल्यानुसारच पक्ष चालेल असे नाही. काँग्रेस पक्ष हा कुठल्याही एका व्यक्तीचा गुलाम होऊ शकत नाही असे रावत म्हणाले.
जो कोणी हिंदुस्थानचा नागरिक आहे, ज्याचा स्वातंत्र्य आंदोलन आणि काँग्रेस पक्षावर विश्वास आहे ती व्यक्ती पक्षात सामील होऊ शकतो असे रावत म्हणाले. प्रशांत किशोरही पक्षात सामील होऊ शकतात. पक्षात नेहमीच नव्या विचारांचा आदर केला गेला आहे. किशोर कितीही सक्षम असले तरी पक्ष एका व्यक्तीचा गुलाम होऊ शकत नाही. तुम्हीच पक्षाची कमान सांभाळा आम्ही काही लक्ष घालणार नाही असे आम्ही म्हणू शकत नाही असेही रावत म्हणाले.
प्रशांत किशोर आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती आहे, त्यांच्या येण्याने पक्षाला निश्चित फायदा होईल असा विश्वास रावत यांनी व्यक्त केला. परंतु पक्षात सामील होण्याची एक पद्धत आहे, त्याच पध्दतीनुसार प्रशांत किशोर यांना पक्षात यावे लागेल. आधी त्यांना पक्षाचे सदस्य व्हावे लागेल त्यानंतर त्यांना कुठलीतरी जवाबदारी दिली जाईल. पक्षात सामील झाल्यानंतरच त्यांनी पक्षाबद्दल टिप्पणी करावी असे रावत म्हणाले.
काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य असलेले रावत म्हणाले की पक्षात प्रत्येकाची एक स्वतंत्र भुमिका आहे. जर प्रशांत किशोर यांची इच्छा असेल तर ते आपली भुमिका पार पाडू शकतात, त्यांचे स्वागत आहे. परंतु त्यांन संविधानाचे आणि पक्षाच्या परंपरेंचे पालन करावे लागेल असेही रावत यांनी नमूद केले.



























































