
मढ येथील बंगल्यात सुरक्षा रक्षकाला मारहाण करून 50 हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना मालवणी पोलिसांनी अटक केली. युवराज बोराडे, नीलम वर्मा, सागर शंकर सोलनकर अशी त्या तिघांची नावे आहेत. याचा पुढील तपास मालवणी पोलीस करत आहेत.
मालवणीच्या मढ आयलॅण्ड येथील बंगल्यामध्ये चित्रीकरण केले जाते. गेल्या आठवडय़ात मनसेचे तीन जण एका बंगल्यात आले. तेव्हा एका महिलेने डय़ुटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाला विचारणा केली. त्यानंतर तिने सुरक्षा रक्षकाला मोबाईलमध्ये एक पह्टो दाखवला. मनसेप्रमुख राज ठाकरे यांना ओळखत नाही का असे सांगून एका महिलेने सुरक्षा रक्षकाला जाब विचारत मारहाण केली. त्याने नकार दिल्यावर महिलेने मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मारहाणीच्या घटनेनंतर सुरक्षा रक्षक सदानंद गौड याने मालवणी पोलीस ठाणे गाठले. खंडणी मागत मारहाण केल्याप्रकरणी मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून युवराज, नीलम, सागरला अटक केली, तर एका महिलेला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती.

























































