बांगलादेशची मुख्य स्पर्धेत धडक; पीएनजीचा धुव्वा उडवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-20 विश्वचषक किप्रेट स्पर्धेतील पहिल्या फेरीत ‘अ’ गटातील अखेरच्या साखळी लढतीत बांगलादेशने पापुआ न्यू गिनी (पीएनजी) संघावर 84 धावांनी दणदणीत विजय मिळवित सुपर-12 फेरीत प्रवेश केला. कारण या विजयासह बांगलादेशने 4 गुणांची कमाई करीत (ओमान-स्कॉटलंड लढतीपूर्वी ) गटात अव्वल स्थानी झेप घेतली. अष्टपैलू कामगिरी करणारा शाकिब अल हसन या सामन्याचा मानकरी ठरला. आता बुधवारी रात्री उशिरा होणाऱया ओमान-स्का@टलंड दरम्यानच्या लढतीनंतरच सुपर-12 फेरी गाठणारा दुसरा संघ ठरणार आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशची अडखळती सुरुवात झाली. धावफलकावरील भोपळाही फुटलेला नसताना मोहम्मद नईम बाद झाला. 29 धावांची छोटेखानी खेळी करून दुसरा सलामीवीर लिटन दासही माघारी परतला. त्यानंतर मश्फीकर रहीम (5) देखील मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. मात्र मग शाकिब अल हसन (46) व कर्णधार महमुदुल्लाह (50) यांनी जबरदस्त फलंदाजी केली. शाकिबने 37 चेंडूत 3 षटकार ठोकले.

शाकिबने कापली मधली फळी

बांगलादेशकडून मिळालेल्या 182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पीएनजी संघाचा डाव 19.3 षटकांत 97 धावांवर गारद झाला. मोहम्मद सैफुद्दीनने लेगा सियाका (5) व तस्कीन अहमदने असाद वाला (6) या सलामीच्या जोडीला झटपट तंबूत पाठवत बांगलादेशला सनसनाटी सुरुवात करून दिली. त्यानंतर शाकिब अल हसनने केवळ 9 धावांच्या मोबदल्यात 4 बळी टिपत पीएनजी संघाची मधली फळी कापून काढली. तळाला केप्लीन डोरीगाने 34 चेंडूंत 2 षटकार व तितक्याच चौकारांसह नाबाद 46 धावांची खेळी करीत बांगलादेशच्या गोलंदाजांचा एकाकी प्रतिकार केला, मात्र दुर्दैवाने दुसऱया बाजूने त्याला साथ मिळाली नाही. चॅद सोपर (11) हा पीएनजीचा दुहेरी धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. इतर फलंदाज एकेरी धावसंख्येवरच बाद झाल्याने या संघाला धावांची शंभरीही गाठता आली नाही. बांगलादेशकडून मोहम्मद सैफुद्दीन व तस्कीन अहमद यांनी 2-2 बळी टिपत शाकिबला साथ दिली.