जम्मू कश्मीरमध्ये चकमक, दोन पोलीस कर्मचारी आणि एक जवान जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरच्या पूंछ भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली आहे. या चकमकीत दोन पोलीस कर्मचारी आणि एक जवान जखमी झाला आहे. पाकिस्तानी दहशतवादी जिया मुस्तफा हा पोलिसांच्या ताब्यात आहे. सुरक्षा दल त्याला घेऊन दहशतवाद्यांचे अड्डे शोधण्यासाठी या भागात आणले होते. तेव्हा दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला.

तर दुसरीकडे शोपियां जिल्ह्यात सुरक्षादल आणि दहशतावाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू झाला आहे.

पूंछ भागातील भट्टा दुरियन जंगलात गेल्या 13 दिवसांपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत 2 पोलीस आणि एक जवान जखमी झाला आहे. तसेच दहशतवादी जिया मुस्तीसुद्धा जखमी झाला असून त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. जखमी पोलीस आणि जवानाला रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जिया मुस्तफा हा तुरुंगात राहूनही पूंछ आणि राजौरीमधील लपून बसलेल्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. मुस्तफा पाकव्याक्त कश्मीरमधील रावलकोटचा रहिवासी आहे. 15 वर्षापूर्वी एलओसी पार करून मुस्तफा हिंदुस्थानात आला होता.