
केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून वंचित, दलित, शोषित समाजघटकांवरचे अत्याचार वाढले आहेत. या मनुवादी विचारांच्या केंद्रातील सरकारने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी चळवळ ठरवून बदनाम करण्याचे पाप केले, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने टिळक भवनात आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित समाज घटकाला मुख्य प्रवाहात आणले. देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो, पण हे संविधानच बदलण्याचे काम सुरू आहे, असे नाना पटोले म्हणाले. या कार्यक्रमाला राज्याचे बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे व अन्य उपस्थित होते.



























































