
मुंबई एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी दिल्लीतील राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलेले आरोप वानखेडे यांनी फेटाळले असून आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी आयोगाला संबंधित कागदपत्रेही सादर केली.
समीर वानखेडे यांनी त्यांच्या तक्रारीसंदर्भात सादर केलेल्या कागदपत्रांची महाराष्ट्र सरकारकडून पडताळणी केली जाईल आणि ती कागदपत्रे कायदेशीर असतील तर त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई होऊ शकत नाही, असे आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांनी सांगितले. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष रामनाथ पारधी हेसुद्धा याप्रसंगी उपस्थित होते. ‘आयोगाने आपल्याकडे मागितलेली कागदपत्रे आपण आज सादर केली. माझ्या तक्रारीची शहानिशा करून आयोगाचे अध्यक्ष लवकरच त्यावर निर्णय देतील,’ असे वानखेडे यांनी यावेळी सांगितले.
मुस्लिम धर्माचे असूनही समीर वानखेडे यांनी जन्माचा खोटा दाखला सादर करून अनुसूचित जातीच्या सवलती घेतल्या असा आरोप करत नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या निकाहनाम्याची प्रत ट्विटरवर सादर केली होती. समीर वानखेडे यांचे खरे नाव ‘समीर दाऊद वानखेडे’ असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यावर वानखेडे यांनी अनुसूचित जाती आयोगाकडे मलिक यांची तक्रार केली आहे. आपण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार असल्याचा इशाराही मलिक यांनी दिला आहे.
























































