
पंजाब काँग्रेसच्या अंतर्गत वादातून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवा राजकीय पक्ष काढून पंजाबच्या राजकारणात वेगळी चूल मांडली आहे. त्यांनी मंगळवारी सुरुवातीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना सात पानी पत्र लिहून काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर स्वतःच्या ‘पंजाब लोक काँग्रेस’ पक्षाची घोषणा केली. त्यांच्या या बंडामुळे पंजाब काँग्रेसला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच मोठा झटका बसला आहे.
पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष निवडीवरून पक्षांतर्गत वाद उफाळला. प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीवर नवज्योतसिंग सिद्धू यांना बसवल्यानंतर अमरिंदर यांचा पारा चढला आणि सप्टेंबरमध्ये ते मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून पायउतार झाले. त्यानंतर पक्षात बऱयाच नाटय़मय घडामोडी घडल्या. अमरिंदर यांनी त्यांची नाराजी जाहीर करतानाच पक्षात घोर अपमान झाल्याचे दुःख व्यक्त केले होते. त्याचवेळी त्यांनी स्वतंत्र पक्ष काढून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार मंगळवारी त्यांनी आपल्या ‘पंजाब लोक काँग्रेस’ पक्षाची घोषणा केली. पक्षाच्या नावनोंदणीला निवडणूक आयोगाची मंजुरी मिळणे बाकी आहे. त्यानंतर पक्षचिन्ह निवडले जाईल, असे त्यांनी ट्विटच्या माध्यमातून जाहीर केले. ट्विटसोबत त्यांनी राजीनामपत्रही शेअर केले. या राजीनामापत्रातून त्यांनी मुख्यमंत्रीपदावर असताना जनहितार्थ तसेच पक्षवाढीसाठी केलेल्या कामांचा लेखाजोखाही मांडला आहे. त्यांचा पक्ष पंजाब विधानसभेच्या सर्व जागांसाठी रिंगणात उतरणार आहे.
राजीनामापत्रातून सिद्धू, रावत यांच्यावर निशाणा
अमरिंदर यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात नवज्योतसिंग सिद्धू व हरीश रावत यांच्यावर निशाणा साधला आहे. सिद्धू यांनी मला व माझ्या सरकारला शिव्या दिल्यामुळे ते प्रसिद्ध झाले. राहुल आणि प्रियंका गांधींनी त्यांना संरक्षण दिले. तुम्ही सिद्धूच्या चालबाजीकडे डोळे बंद करून राहिलात. तुम्हाला हरीश रावत यांनी भडकावले. रावत हे सर्वाधिक अविश्वसनीय व्यक्ती आहेत, अशी नाराजी अमरिंदर यांनी सोनिया गांधींकडे व्यक्त केली आहे. सिद्धूला प्रदेशाध्यक्ष बनवण्याच्या निर्णयाचा एक दिवस पश्चाताप होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.





























































