T20 World Cup INDvsSCT साधा नको, धमाकेदारच विजय हवा, हिंदुस्थानच्या रडारवर आज स्कॉटलंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यासाठी हिंदुस्थानी संघ दुसऱया संघांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. त्यामुळेच जर-तर समीकरणाच्या फेऱयात अडकलेल्या ‘टीम इंडिया’ला उद्या शुक्रवारी स्कॉटलंडविरुद्ध केवळ विजय नव्हे तर धमाकेदार विजयाची गरज आहे. अफगाणिस्तानचा 66 धावांनी धुव्वा उडवून पराभवाच्या गर्तेतून बाहेर आलेल्या विराट कोहलीचा संघ स्कॉटलंडवरही मोठा विजय मिळविण्यासाठी आतूर झाला आहे.

…तरच उघडणार उपांत्य फेरीचे दार

पाकिस्तान व न्यूझीलंडविरुद्धच्या सुपर-12 लढतीत मानहानीकारक पराभवामुळे ‘टीम इंडिया’चाही रनरेट खराब झाला आहे. त्यामुळे हिंदुस्थानला आता प्रत्येक सुपर-12 लढतींत मोठा विजय मिळविण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. याचबरोबर न्यूझीलंडला नामिबिया पिंवा अफगाणिस्तानने हरविले तरच हिंदुस्थानसाठी उपांत्य फेरीचे दार उघडले जाणार आहे.

‘टीम इंडिया फॉर्मात’

अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत रोहित शर्मा, लोकेश राहुल, रिषभ पंत व हार्दिक पांडय़ा या फलंदाजांनी धावांची लयलूट केली. न्यूझीलंडविरुद्ध संघाबाहेर असलेला सूर्यकुमार यादव परतल्याने हिंदुस्थानच्या फलंदाजीची ताकद वाढली आहे. शिवाय रवींद्र जाडेजानेही अखेरच्या षटकामधील हाणामारीची भूमिका चोखपणे बजावलेली आहे. याचबरोबर तब्बल चार वर्षांनंतर टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेला फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने 4 षटकांत 14 धावा देत 2 फलंदाज बाद करून टीकाकारांची तोंडे गप्प केली आहेत. मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह यांनीही दिशा आणि टप्पा सापडला आहे, मात्र या वेगवान जोडगोळीकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

स्कॉटलंडमध्येही क्षमता

स्कॉटलंड हा नवखा संघ असला तरी दुर्लक्ष करण्याइतका दुबळा नक्कीच नाही. त्यांनी मागील सामन्यात न्यूझीलंडलाही विजयासाठी झुंजविले होते. मार्टिन गप्टीलची93 धावांची वादळी खेळी नसती तर स्कॉटलंडने न्यूझीलंडलाही पराभवाचा धक्का दिला असता. पहिल्या फेरीच्या सामन्यात स्कॉटलंडने बांगलादेशलाही पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे हिंदुस्थानला या नवख्या संघाला कमी लेखण्याची चूक करता येणार नाही. त्यांच्याकडे सातव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी आहे. मार्क वॉट, ब्रेडली व्हील व साफयान शरिफ असे प्रतिभावान गोलंदाजही स्कॉटलंडच्या मदतीला आहेत.
आजच्या लढती
नामिबिया वि. न्यझीलंड
गट 2- शारजा, दुपारी 3ः30 वाजता
हिंदुस्थान वि. स्कॉटलंड
गट 2 – दुबई, रात्री 7ः30 वाजता