
रेल कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार आनंदराव अडसूळ आणि कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सरचिटणीस दिवाकर देव यांच्या नेतृत्वात रेल कामगार सेनेच्या शिष्ठमंडळाने मुंबई भेटीवर आलेल्या रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांची भेट घेऊन विविध मागण्या केल्या. प्रचंड तणावाखाली काम करणाऱया मोटरमन, ड्रायव्हर व गार्ड यांच्या स्पॅड आणि प्लॅटफॉर्म ओव्हर शुटिंगमध्ये देण्यात येणाऱया शिक्षेस परिस्थितीजन्य पुराव्यानुसार योग्य न्याय द्यावा, अशी मागणी या वेळी शिष्ठमंडळाने केली आहे.
मुंबई भेटीवर आलेल्या रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांची रेल्वे कामगार सेनेच्या शिष्ठमंडळाने भेट घेऊन त्यांचा शाल आणि श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या वेळी मुंबई उपनगरात लोकल चालविताना रेड सिग्नल ओलांडणे तसेच प्लॅटफॉर्म सोडून लोकल थांबविण्यासारख्या प्रकरणात मोटरमन, ड्रायव्हर आणि गार्डवर कठोर कारवाई करण्यात येते. या वेळी परिस्थितीजन्य पुराव्यानुसार कमी शिक्षा करण्यात यावी, अशी आग्रही मागणी रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर देव यांनी केली. त्यावर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी परिस्थितीजन्य पुरावे लक्षात घेऊन मोटरमनना योग्य तो न्याय द्यावा, असे निर्देश रेल्वे अधिकाऱयांना दिले. याप्रसंगी नरेश बुरघाटे, चंद्रकांत विनरकर, राजेंद्र पाटोळे, संतोष शेलार, बी.बी. शर्मा शिव वर्मा, मल्हारी भटाटे, प्रतीक गायकर, राजा कुट्टी, स्टॅनली झेवियर आदी उपस्थित होते.






























































