
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ आणि हेमाडपंथी स्थापत्य शास्त्राचा अद्भूत चमत्कार असणाऱया करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात उद्यापासून (दि. 9) किरणोत्सव सोहळा सुरू होत आहे.
वर्षातून दोन वेळा तीन दिवस हा किरणोत्सव सोहळा पाहण्यास मिळतो. यामध्ये सायंकाळी मावळतीच्या सूर्याची किरणे पहिल्या दिवशी देवीच्या चरणांना अभिषेक घालतात. दुसऱया दिवशी कमरेपर्यंत पोहोचतात, तर तिसऱया दिवशी देवीच्या मुखावर पोहचणाऱया सूर्यकिरणांनी देवीचे तेज अधिकच खुलून दिसते.
श्री अंबाबाई मंदिरात सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायनमध्ये हा सोहळा होतो. उत्तरायणमध्ये किरणोत्सव 31 जानेवारी व 1 आणि 2 फेब्रुवारी असा तीन दिवस होत होता. तो आता 29, 30 व 31 जानेवारी आणि 1 व 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे, तर प्रतिवर्षीप्रमाणे नोव्हेंबर महिन्यात दक्षिणायनमध्ये होणारा किरणोत्सव मंगळवार (दि. 9) ते शनिवार (दि. 13) या कालावधीत होणार आहे. पूर्वी हा किरणोत्सव दि. 9 ते 11 असा तीन दिवस होत होता.
किरणोत्सवासंदर्भात रविवारी खगोल अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर व त्यांच्या सहकाऱयांनी निरीक्षण करून नोंदी घेतल्या. ढगाळ वातावरणामुळे किरणे महाद्वार रोड, गरुड मंडपातून येऊन गणेशमूर्तीपासून लुप्त झाल्याचे डॉ. कारंजकर यांनी सांगितले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे उपस्थित होते.
तीन दिवस सायंकाळी 5 ते 6 या वेळात ई-पास राहणार बंद
सध्या श्री अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी ई-पास दाखवावा लागतो. पण किरणोत्सवाचा कालावधी सायंकाळी 5 ते 6 असल्याने या तासाभरात ई-पासचा स्लॉट बंद करण्यात येणार आहे.


























































