
जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत जखमी झालेल्या एका रुग्णाचा आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आग प्रकरणातील मृतांची संख्या आता 12 झाली आहे. लक्ष्मण आसराजी सावळकर (वय 60, रा. बोधेगाव, ता. शेवगाव) असे मृत रुग्णाचे नाव आहे.
6 नोव्हेंबर रोजी जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागाला आग लागली होती. जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागात 17 रुग्ण उपचार घेत होते. कोरोनावर उपचार घेणाऱया 11 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यांत सहा महिला व पाच पुरुषांचा समावेश होता. सहा रुग्ण जखमी झाले असून, त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. यांतील लक्ष्मण सावळकर यांचा आज मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेतील एकूण मृतांची संख्या आता 12 झाली आहे.
दरम्यान, नगर जिल्हा रुग्णालय आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या या समितीची बैठक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तालयात सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. या चौकशी समितीच्या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्निशमन विभाग, विद्युत विभागासह इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्तालयात झालेली या समितीची ही दुसरी बैठक होती. पहिली बैठक यापूर्वी नगर येथे झाली असून, त्यावेळी या समितीचे अध्यक्ष आणि विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थितीत स्थळनिरीक्षण करण्यात आले होते. विभागीय आयुक्तालयात पार पडलेल्या या चौकशी समितीच्या बैठकीतील तपशील प्रशासकीय गोपनीयतेचा भाग म्हणून उपलब्ध होऊ शकला नसला, तरी आठ तासांहून अधिक काळ या चौकशी समितीचे कामकाज चालल्याने नगर जिल्हा रुग्णालय आगीच्या घटनेच्या निमित्ताने बऱयाच बाबी उजेडात येण्याची शक्यता वाढली आहे.
डॉ. सुनील पोखरणा यांच्या जामिनावर आक्षेप
नगर जिल्हा रुग्णालयाच्या जळीतकांडप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या जामीन अर्जावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी न्यायालयामध्ये आक्षेप घेतला आहे. जाधव यांनी यासंदर्भात हरकती नोंदवीत थर्ड पार्टी अर्ज न्यायालयामध्ये आज दाखल केला आहे. या अर्जावर सरकारी वकील व आरोपींच्या वकिलांना आपले म्हणणे सादर करण्याचा आदेश येथील जिल्हा न्यायाधीश एम. आर. नातू यांनी दिला आहे. दरम्यान, पोखरणा यांच्या जामिनावर म्हणणे मांडण्यासाठी पोलीस प्रशासनाने पाच दिवसांची मुदत मागितली आहे. त्यामुळे जामीन अर्जासह जाधव यांच्या अर्जावर 23 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
विद्युत निरीक्षकांचा अहवाल चौकशी समितीकडे
जिल्हा रुग्णालयातील आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर मुंबई येथील महावितरणचे मुख्य विद्युत निरीक्षक यांच्या अहवालाची प्रतीक्षा पोलिसांना होती; पण हा अहवाल पोलिसांना न देता थेट विभागीय आयुक्त गमे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या चौकशी समितीला सादर केल्याचे मुख्य विद्युत निरीक्षक दिनेश खोंडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे या अहवालाच्या आधारे त्यांच्याकडे दाखल गुह्यात पुढील कारवाई कशी करायची? असा प्रश्न नगरच्या पोलिसांना पडला आहे. त्यामुळे नाशिक विभागीय आयुक्तांकडून या अहवालाच्या प्रतीची प्रतीक्षा
पोलिसांना आहे.


























































