
नेहमी वादात अडकून कुप्रसिद्ध झालेला माजी जगज्जेता मुष्टीयोद्धा माईक टायसन आता वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध होत आहे. मेंदू, हृदय आणि अन्य अवयवांवर विपरीत परिणाम करू शकणाऱ्या बेडकाच्या विषापासून बनवलेल्या टोड व्हेनमच्या धुराची नशा टायसन करू लागला आहे.
तो म्हणतो, पहिल्यांदा मी जेव्हा या नशेचा पहिला झुरका घेतला तेव्हा मला वाटले की मी मेलोय. पण तसे घडले नव्हते. एका शांत आणि सुसह्य मरणाची ती रंगीन तालीम होती. त्यातून बाहेर पडल्यावर मी अधिक सक्रिय झालोय. पुन्हा बॉक्सिंगकडे वळलोय. एका वेगळ्याच अनुभूतीतून मी जातोय. अर्थात टायसनला हे लागलेलं व्यसन अतिशय भयानक आहे असं वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
मुष्टीयुद्धाच्या रिगमधून निवृत्ती स्वीकारल्यावर खेळातला हा ‘बॅडमॅन’ दारू आणि ड्रग्जच्या आहारी गेला आहे. त्याच्या एका मित्राने त्याला टॉड व्हेनम म्हणजे बेडकाच्या विषापासून बनवल्या जाणाऱ्या नशिल्या पदार्थाची ओळख करून दिली. सुरुवातीला या नशिल्या धुराचा झुरका घेतल्यावर टायसन हादरला होता. पण त्यातून सावरल्यावर तो टॉड व्हेनमची तरफदारी करायला लागला आहे.
सर्वांना कधीतरी मरायचेय, पण मरण सुंदर असायला हवे!
टायसन म्हणतो, आपण सर्वच कधीतरी मरणार आहोत. मग मृत्यूची भीती कशाला बाळगायची. माझ्या मते जीवन आणि मृत्यू दोन्ही सुंदर असायला हवेत. म्हणूनच मी टॉड व्हेनमची नशा करून मरण सुसह्य आणि सुंदर करणार आहे. कारण आपल्या मृत्युची तारीख ठरलेली असते.
काय होते टॉड व्हेनम घेतल्यावर
सोनोरन डेझर्ट टोड जातीच्या बेडकाच्या विषापासून टॉड व्हेनम बनवले जाते. त्याच्या ड्रॉप्सचा धूर धूम्रपान करताना घेतला जातो. पहिल्याच झुरक्यात फक्त 20 ते 30 मिनिटांत या ड्रग्जची नशा माणसावर अंमल करते. माणूस शुद्ध हरपून बसतो. या विषाची नशा डीएमटी (डायमिथाइलट्रीपटामाईन) या ड्रग्जपेक्षा 4 ते 6 पटींनी अधिक असते. या नशेचे वर्णन शब्दांत सांगता येणार नाही असे ही नशा करणारे काही नशेबाज सांगतात. मात्र या नशेच्या औषधाने माणसाची आतडी, मेंदू आणि हृदयावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मृत्युचा धोका वाढतो. कोलोरॅडो रिवर टोड (5-MeO-DMT) या नैसर्गिक ड्रग्जवर अमेरिकेत बंदी आहे. ते बाळगल्यास 10 वर्षेपर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते.

























































