रविवारी 167 बस धावल्या; एसटीने स्टिअरिंग दिले नव्या चालकांकडे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटीचा संप मोडून काढण्यासाठी महामंडळाने भरतीच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नोकरीत सामावून घेण्यास सुरुवात केली असून आज या नवनियुक्त चालकांद्वारे राज्याच्या विविध मार्गांवर प्रवाशांच्या सेवेसाठी लाल परी रवाना झाली. सायंकाळी चार वाजेपर्यंतच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार एकूण 167 बसेसद्वारे विविध मार्गांवर 4,619 प्रवाशांची वाहतूक करण्यात आली.

दिवाळीच्या आधीपासून सुरू असलेल्या संपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही.  अशात प्रवाशांचे हाल होत असल्याने महामंडळाने एसटीच्या रोजंदारी कर्मचाऱयांना 24 तासांत कामावर हजर होण्याची सेवा समाप्तीची नोटीस दिली होती. नंतर कामावर हजर न झालेल्यापैकी पहिल्या टप्प्यात 238 रोजंदारी कर्मचाऱयांची सेवा समाप्त करण्यात आली. तर 380 रोजंदारी कामगारांची सेवा समाप्त करण्यात आल्याने एकूण 616 रोजंदारी कर्मचाऱयांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. तर संपात सहभागी एकूण 2937 कर्मचाऱयांना आतापर्यंत निलंबित करण्यात आले आहे.

साध्या गाडय़ांवर नवनियुक्त चालक

एसटी कर्मचारी कामावर आले नसल्याने महामंडळाने आधीच्या भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना म्हणजे 2016-17 आणि 2019 मधील उमेदवारांना सेवेत घेण्यास सुरुवात केली आहे. तर आज मुंबई, पुणे, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, सांगली, रत्नागिरी, धुळे विभागातून शिवनेरी, शिवशाही आणि साध्या अशा 167 बसेस सोडण्यात आल्या. 61 शिवनेरी, 73 शिवशाही आणि 33 साध्या बसेस सोडण्यात आल्या. विशेष म्हणजे प्रतीक्षा यादीत उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली असून या नवनियुक्त चालकांकडून एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत. त्यातून 4,619 प्रवाशांची वाहतूक करण्यात आली.

महामंडळाच्या याचिकेकर आज हायकोर्टात सुनावणी

औद्योगिक न्यायालयाने एसटी कर्मचाऱयांचा संप बेकायदेशीर ठरवणारा आदेश 29 ऑक्टोबरला दिला. यानंतरही संप सुरूच असल्याने हा न्यायालयाचा अवमान असल्याची याचिका महामंडळाने हायकोर्टात दाखल केली आहे. त्यावर उद्या सोमवारी सुनावणी होणार आहे.

आमचं सरकार असतानाही कुठे झाले विलीनीकरण?

एसटी कामगारांच्या आंदोलनाला भाजपकडून पाठिंबा दिला जात असतानाच, आमचे सरकार असताना कुठं झाले विलीनीकरण? असा सवाल करीत भाजपचा मित्र पक्ष असलेल्या रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी घरचा आहेर दिला आहे. रस्त्यावर असताना एक बोलावं लागते आणि आत गेल्यावर एक असते,  हा सिस्टिमचा भाग आहे, त्यामुळे जनतेने हुशार झाले पाहिजे हाच त्यावरचा पर्याय असल्याचे सांगताना त्यांनी एसटी संपाबाबत भाजप नेत्यांकडून केल्या जाणाऱया वक्तव्याची हवाच काढून टाकली आहे.

भाजपकडून गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी एसटी संपात सामील होऊन विलिनीकरणाची मागणी लावून धरली आहे. सरकारसोबत झालेल्या बैठकांनंतरही त्यांचा दुराग्रह सुरूच आहे. यावर वक्तव्य करताना महादेव जानकर यांनी आमच्या काळातही एसटीच्या विलीनीकरणाचा प्रश्न उपस्थित झाला होता. पण तेव्हा कुठे झाले विलीनीकरण? त्यामुळे सिस्टिमचा हा भागच असल्याचे सांगितले. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते आशीष शेलार यांनी एसटी संपाला दिलेला पाठिंबा आणि विलीनीकरणाच्या केलेल्या मागणीत काही राम नसल्याचेच स्पष्ट केले आहे.

रविकांत तुपकरांची भेट

शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात आंदोलन पुकारलेय. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जानकर यांनी त्यांची तिथे भेट  घेतली. तुपकर माझे चांगले मित्र आहेत. तुपकर चळवळीतील कार्यकर्ते आहेत. सरकारने शेतकऱयांच्या मागण्यांसंदर्भात त्यांना चर्चा करायला बोलावले आहे. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हाके म्हणून आलो असल्याचे जानकर यांनी सांगितले.